वसुबारसच्या दिवशी बळीराज्याच्या डोळ्यात पाणी; २० एकर ऊस जळून खाक

बीडमधील महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे ऐन दिवाळीत आणि वसुबारसेच्या दिवशी शेतकऱ्याच्या २० एकर ऊस जळून खाक झाला आहे. वसुबारसेच्या दिवशी डोळ्यादेखत २० एकर ऊस जळून खाक झाल्याने हळहळ व्यक्त केली जात असून महावितरणाच्या गलथान कारभाराचा तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. बीडमधील गेवराई तालुक्यातील मिरगाव येथे बुधवारी दुपारी ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत शेतकरी भारत शंकर दातवासे, अर्जुन शंकर दातवासे, भीमराव शंकर दातवासे, नारायण दातवासे, भागवत आखरे, मुक्ताबाई खूपसे, लक्ष्मण आखरे या शेतकऱ्यांचा २० एकर ऊस जळून खाक झाला.

मिरगाव येथे बुधवारी दुपारी अचानक दोन तारांमध्ये संपर्क झाला आणि ठिणग्या उडाल्या. या ठिणग्या उसाच्या फडात पडल्या. त्यामुळे अख्ख्याने ऊसाच्या शेतीने पेट घेतला. बघता बघता आगीने प्रचंड रौद्ररुपधारण केले. आगीमध्ये २० एकरावरील ऊस शेती भस्मसात झाली. ऊसाच्या शेताला लागलेली आग पाहताच शेतकऱ्यांनी जीवाच्या आकांताने धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण प्रयत्नांना यश आले नाही. मोठ्या मेहनतीने अस्मानी संकटाचा सामना करून उभे केलेले उसाचे पिक डोळ्यासमोर जळून खाक झाले. दिवाळी सणाच्या तोंडावर ऊस जळून खाक झाल्यामुळे शेतकऱ्यांचा अश्रूचा बांध फुटला.


हेही वाचा – पंतप्रधान मोदींमुळे देशात पहिल्यांदा मंदी; राहुल गांधींचा घणाघात