घरमहाराष्ट्रनाशिकआमची काळजी सोडा; खेकडे अन् धरणांकडे लक्ष द्या

आमची काळजी सोडा; खेकडे अन् धरणांकडे लक्ष द्या

Subscribe

काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर पलटवार

राज्यात भाजप, शिवसेना युतीतर्फे ‘फिल गूड’ असल्याचे वातावरण निर्माण केले जात असून आघाडीच्या 50 जागा सुद्धा निवडून येणार नाही, असे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणतात. त्यांनी काँग्रेसची काळजी करण्यापेक्षा खेकडांमुळे धरणे पोखरली जात आहेत, त्याची जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगत महाजनांना प्रतिटोला लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. मात्र, विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका या स्वतंत्र मुद्द्यांवर लढवल्या जातात. त्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षपद सांभाळण्याचे आव्हान माझ्यासमोर असल्याचे मान्य करत थोरात यांनी पक्षाचे धोरण बदलणार असल्याचे संकेत दिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रविवारी (दि.14) सायंकाळी त्यांनी नाशिकमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. थोरात म्हणाले की, राज्यात सर्वकाही आलबेल सुरू असल्याचे आभासी चित्र सत्ताधारी भाजप, शिवसेना युतीकडून निर्माण केले जात आहे. मात्र, 2004 मध्ये अशाच स्वरुपाचे वातावरण निर्माण झालेले असताना काँग्रेसने विजय मिळवला होता. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी, कामगार वर्ग पूर्णत: नाराज आहे. केंद्र सरकार निर्यात धोरणांमध्ये अवास्तव हस्तक्षेप करून कांद्याच्या किमती नियंत्रित ठेवत असल्याचे सर्वज्ञात आहे. औद्योगिक क्षेत्रात मंदीचे सावट पसरले असून, ऑटोमोबाईल क्षेत्राचे उत्पादन 50 टक्क्यांनी घटले आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असल्यामुळे शेती क्षेत्राचा विकास कमी झाल्यास त्याचा प्रभाव अन्य क्षेत्रांवर पडत असल्याने राज्यात मंदीची लाट असल्याचे त्यांनी म्हटले. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात येणार्‍या विधानसभा निवडणुकीत दुप्पट जागा जिंकण्याचे प्रमुख आव्हान आमच्यासमोर असले तरी घटक पक्षांच्या मदतीने हे आव्हान पार करण्यार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे गिरीश महाजन यांनी काँग्रेसची काळजी करण्यापेक्षा खेकडे धरणे पोखरत असून त्या धरणांची काळजी घ्यावी. महाजन हे आमचे चांगले मित्र असले तरी ते खेळाडू वृत्तीचे असल्यामुळे त्यांना राजकीय जाणीव करून देण्याची गरज निर्माण झाल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक गाडीसमोर फटाके

काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे आगमण होणार म्हणून शासकीय विश्रामगृहावर रविवारी संध्याकाळी सहापासून अतिउत्साही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत करण्यासाठी गर्दी केली होती. स्वागत करण्याचा उत्साह एवढा होता की, विश्रामगृहात कोणतीही नवी गाडी शिरली की,  फटाके फोडण्यात येत होते. मात्र, ही गाडी प्रदेशाध्यक्षांची नव्हे तर दूसर्‍याच कोणाची निघत असल्याने ते फटाके वाया जात होते. असे बर्‍याचवेळा घडल्याने शेवटी फटाके संपत आले, त्यामुळे कार्यकर्त्यांना चिंता लागली की आता फटाके आणायचे कुठून? अखेर प्रदेशाध्यक्षांची गाडी आली आणि त्यांचे स्वागत पार पडल्यानंतर फटाक्यांसह ढोल ताशांची आतषबाजी करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -