दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम

दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा होणार याबाबत सरकारकडून कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात अनिश्चितता पसरली आहे. ही अनिश्चितता किती काळ राहणार याबाबत काहीच अंदाच बांधता येत नाही. शिक्षण क्षेत्रात सध्या ऑनलाईन वर्ग सुरू असून, अंतिम वर्षाच्या परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा होणार याबाबत सरकारकडून कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुळे शाळा सुरू होणार नसल्या तरी शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याचे सांगत ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. सध्या पहिली ते दहावीचे सर्व वर्ग ऑनलाईन चालत आहेत. त्याचबरोबर अंतिम वर्षाच्या परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. दहावी आणि बारावीचे वर्गही ऑनलाईन पद्धतीने हाते आहेत. शिक्षण सुरू असले तरी परीक्षा कशी होणार याबाबत मात्र विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम सरकारने लवकर दूर करून विद्यार्थ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.

कोरोनामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा घेणे शक्य नसेल तर त्या एप्रिल किंवा मेमध्ये घेण्यात याव्यात. तसेच पेपरचे स्वरूप, आराखड्यात बदल करू नये कारण विद्यार्थ्यांनी इयत्ता नववीपासून त्या आराखड्यानुसार विषयांचा सराव केला आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलणे हा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो. आराखडा निश्चित करताना विषयांचे गुणांकन तेच ठेवावे. कमी गुणांची परीक्षा घेतल्यास अकरावी प्रवेशावेळी अन्य बोर्डांच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. अंतर्गत मुल्यामापनासंदर्भातील धोरण निश्चित करताना सरकारने आराखडा तयार करावा, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे संयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे.