‘शेजाऱ्यांकडे जरा बघा’, हर्षवर्धन पाटील यांचा बारामतीवर निशाणा

Mumbai
Harshvardhan Patil
माजी आमदार हर्षवर्धन पाटील

“भाजप सरकारमध्ये असतानाही मला शांत झोप लागायची. कारण मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. राजकारणात मित्र आणि शत्रू बदलू शकतो. पण शेजारी बदलता येत नाही. त्यामुळे माझ्या शेजारील मतदारसंघावर अधिक लक्ष घाला”, अशी विनंती काँग्रेसचे माजी आमदार आणि आता भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आज मुंबईतील गरवारे क्लब येथे पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलत असताना पाटील यांनी अजित पवार यांचे नाव न घेता बारामती मतदारसंघावर अप्रत्यक्ष भाष्य केले.

प्रामाणिकपणाने काम करायचे असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही

इंदापूरचे माजी आमदार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. “आजचा ऐतिहासिक दिवस आहे. इंदापूरच्या जनतेच्यावतीने मी भाजपमध्ये प्रवेश करतोय, याचा मला अभिमान आहे. माझे काका यांच्या संस्कारात वाढलेली आमची पिढी आहे. राजकारणात आम्ही कधी निष्ठा, प्रामाणिकपणा सोडला नाही. प्रामाणिकपणाने राजकारण करायचे असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही.”, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भाषणात दिली.

पाटील पुढे म्हणाले की, फडणवीस सरकारने दुष्काळग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत केली. पण माझ्याबरोबर आज पक्षात आलाय तो अन्यायग्रस्त समाज आहे. त्यामुळे आम्हाला न्याय द्यावा, अशी माझी विनंती असल्याचे त्यांनी सांगितले. पाटील यांनी यावेळी केंद्र आणि राज्य सरकारचे भरभरून कौतुक केले. केंद्राने कलम ३७०, मोटर वाहन दुरुस्ती अधिनियम असेल असे धाडसी निर्णय केंद्र सरकारने घेतले आहे. तर राज्यात फडणवीस सरकार यांनी देखील जनतेला न्याय देण्याचे काम केले असल्याचे ते म्हणाले.

“देवेंद्र फडणवीस विरोधात असताना मी संसदिय कार्यमंत्री होतो, त्यामुळे त्यांचे काम जवळून पाहीले आहे. आम्ही दोघांनीही आपापली जबाबदारी पार पाडली. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यावर कितीही संकटे आली तरी त्यांचा चेहरा नेहमी हसरा असल्याचे पाहायला मिळाले. आता तो आणखी खुलेल कारण हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आलेला आहे. माझ्यावर कोणतीही जबाबदारी टाका ती पार पाडण्यासाठी मी पुर्ण प्रयत्न करेल, हा माझा शब्द आहे. मी कुठलीही अट टाकून भाजपमध्ये आलेलो नाही”, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.