Coronavirus Maharashtra: राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा ४ हजार पार

Mumbai
corona virus
प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा रविवारी चार हजार पार गेला आहे. रविवारी राज्यात ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली असली तरी ५०७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे. राज्यात रविवारी १२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूपैकी मुंबईत ६ आणि मालेगाव ४ तर १ मृत्यू सोलापूर मनपा आणि १ मृत्यू जामखेड अहमदनगर येथील आहे. मृत्यूंपैकी ४ पुरुष तर ८ महिला आहेत. रविवारी झालेल्या १२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६ रुग्ण आहेत तर ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. मालेगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या ४ रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप अप्राप्त आहे. उर्वरित ८ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये ( ७५ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २२३ झाली आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७२,०२३ नमुन्यांपैकी ६७,६७३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४२०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८७,२५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६,७४३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३६८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ६३५९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २३.९७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.