घरमहाराष्ट्रनाशिकलोकसभेचा अचूक निकाल सांगा; २१ लाख जिंका

लोकसभेचा अचूक निकाल सांगा; २१ लाख जिंका

Subscribe

लोकसभा निवडणूकीचा निकाल येत्या २३ तारखेला लागणार आहे. त्याबद्दल उत्सुकता आहे. तत्पूर्वी नाशिकला ज्योतिष परिषद होत आहे. या परिषदेला विरोध करत अंनिसने हे आवाहन केले आहे. नाशिकमध्ये शनिवार (दि.१८) व रविवारी (दि.१९) होणार्‍या राज्यस्तरीय वास्तु-ज्योतिष अधिवेशनाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला आहे. फलज्योतिष व वास्तुशास्त्र थोतांड आहे. याच्या माध्यमातून सामान्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन काही धूर्त व्यक्ती सर्रासपणे समाजाची आर्थिक व मानसिक लूट करीत असतात. यामुळे या अधिवेशनाला उपस्थित राहू नये, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार फलज्योतिष व तथाकथित वास्तुशास्त्रातील बिनबुडाचे ठोकताळे मोठ्या हुशारीने हे कथित वास्तुज्ज्ञ, वास्तुविशारद, वास्तुपंडित लोकांच्या गळी उतरवण्यात यशस्वी होतात. भूखंडाचा आकार व घरातील खोल्यांची रचना याबाबत हास्यास्पद दावे करीत, हे तथाकथित तज्ज्ञ सामान्यांना भीतीदायक वातावरणात गुंतवून ठेवतात. विज्ञानातील संकल्पनांचा खुबीने वापर करून उच्चशिक्षित भारतीय समाजाला बळी पाडण्यात हे यशस्वी झाले आहेत. हे छद्मविज्ञानाचे पुरस्कर्ते सांगतील तेच विज्ञान खरे असे रेटून सांगत असले, तरी खर्‍या विज्ञानातील निरीक्षण, प्रयोग, चिकित्सा, कार्यकारणभाव व पुरावा या संकल्पनांचा मागमूसही यांच्या दाव्यांमध्ये नसतो. वास्तविक मानवाने त्याच्या सोयीसाठी दिशांची निर्मिती केली असून या दिशांवर आधारीत घरांची रचना, मानवी सुखदुखांशी जोडणार्‍या या पद्धतीला वास्तुशास्त्र म्हणणे चुकीचे असल्याचे ‘महाराष्ट्र अंनिस’ने स्पष्ट केले आहे. यामुळे अशा थोतांडाशी संबंधित अधिवेशन, परिषदा यांना कुणीही उपस्थित राहू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकावर राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, राज्य सदस्य राजेंद्र फेगडे, समन्वयक कृष्णा चांदगुडे यांच्या सह्या आहेत.

- Advertisement -

निकाल सांगा, २१ लाख जिंका

फलज्योतिष व वास्तुशास्त्राला शास्त्र माणणार्‍या कथित तज्ज्ञांना लोकसभा निकाल अचूक सांगा व २१ लाख रुपये जिंका, असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिले आहे. समितीने याबाबत प्रश्नावली जाहीर केली असून त्यात सध्याच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचे कोणकोणते उमेदवार निवडून येतील, किती मताधिक्याने निवडून येतील, त्यांची टक्केवारी किती असेल, ‘नोटा’ किती लोक वापरतील आदी २५ प्रश्न विचारले आहेत. ही प्रश्नावली पूर्ण करून २० मेपर्यंत ती समितीकडे सादर करावी. यातील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्‍यास २१ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे समितीने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -