घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये १०६ रिक्षा जप्त; ३२२ बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई

नाशिकमध्ये १०६ रिक्षा जप्त; ३२२ बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई

Subscribe

नाशिक शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांवर विशेष मोहिमेअंतर्गत आज, सोमवारी १३ पोलीस ठाणे हद्दीतील ४२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या ३२२ बेशिस्त रिक्षाचालकांवर पोलिसांनी दंडात्मक धडक कारवाई केली. त्यांच्याकडून ७८ हजार ७०० रुपये दंडाची वसुली केली. पोलिसांनी १०६ रिक्षा कागदपत्रे व फिटनेस प्रमाणपत्र नसल्याने ताब्यात घेतल्या. मीटरप्रमाणे प्रवासीभाडे नाकारणार्‍या तीन रिक्षाचालकांवर पोलिसांनी स्टिंग ऑपरेशनव्दारे कारवाई केली. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी सोमवारी शहरात १३ पोलीस ठाणे हद्दीतील ४२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली.

मोहिमेअंतर्गत दिवसभर रिक्षांची तपासाणी करण्यात आली. या मोहिमेत सहा पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी व २५० पोलीस कर्मचारी, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व २२५ कर्मचारी सहभागी झाले होते. बेशिस्त रिक्षाचालक, विना लायसन्स, विना बॅच रिक्षाचालक, विना परमीट रिक्षा व अ‍ॅपेरिक्षा, मुदतबाह्य रिक्षा, विना रजिस्ट्रेशन ओला व उबेर टॅक्सीवर आरटीओ, वाहतूक शाखा, पोलीस ठाणे यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. शहरात पोलीस मोठ्या संख्येने रिक्षाचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याने रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत.

- Advertisement -

रिक्षाचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. चालकांनी रिक्षा कागदपत्रे सोबत बाळगावीत. बेशिस्त रिक्षाचालकांवर शहर पोलीस, आरटीओतर्फे कडक कारवाई केली जाणार आहे.
– पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलीस उपायुक्त, वाहतूक

या कालबाह्य रिक्षांवर होणार कारवाई

एमडब्लूएन १ ते ९९९९, एमसीएन १ ते ९९९९, एमएच १५ बी १ ते ९९९९, एमएच १५ जे १ ते ९९९९, एमएच १५ वाय १ ते २५०, एमएच १५ झेड १ ते ३०० या रिक्षांना २० वर्षे पूर्ण झाले आहेत. या रिक्षा मालकांनी आरटीओमार्फत रिक्षा स्क्रॅप करुन घ्यावी, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

- Advertisement -

रिक्षा थांब्यांसाठी अ‍ॅप

शहर पोलिसांकडून रिक्षा थांब्यांसाठी अद्यावत अ‍ॅप तयार करण्यात येणार आहे. त्यात थांब्याप्रमाणे रिक्षांची माहिती संकलित केली जाणार आहे. या ठिकाणी प्रवाशांना तक्रार करण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक प्रसिद्ध केला जाणार आहे.

स्कूल व्हॅनचालकांवरही होणार कारवाई

एक डिसेंबरपासून अवैध स्कूल व्हॅन चालकांवरही कारवाई केली जाणार आहे. शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातील शाळा व महाविद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. त्यांच्याकडून हमीपत्र भरुन घेतले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -