भाजपने पक्षांतराचा बाजार मांडलाय – जयंत पाटील

शिवस्वराज्य यात्रेचा आजचा सहावा दिवस असून सकाळी परळी येथील श्री वैजनाथाचे आणि अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी मंदिरात दर्शन घेऊन शिवस्वराज्य यात्रेची केज विधानसभा मतदारसंघातील पहिली सभा पार पडली. भव्य मोटारसायकल रॅलीने शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

Parali
Jayant Patil says BJP has set up a market for partition
जयंत पाटील

भाजपने पक्ष बदलाचा बाजार मांडला आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अंबाजोगाई येथील जाहीर सभेत केली. वेगवेगळ्या माध्यमातून विरोधकांना संपवण्याचे प्रकार भाजपकडून सुरु आहे, असेही ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर पक्ष सोडून जाणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. ‘पवारसाहेबांनी सगळं काही दिलं. खुर्चीशिवाय त्यांना कुठेही बसवलं नाही ते लोक पक्ष सोडून गेले आहेत. परंतु त्यांच्या जाण्याने तरुण कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे’, असे जयंत पाटील म्हणाले. शिवस्वराज्य यात्रेचा आजचा सहावा दिवस असून सकाळी परळी येथील श्री वैजनाथाचे आणि अंबाजोगाई येथील श्री. योगेश्वरी मंदिरात दर्शन घेऊन शिवस्वराज्य यात्रेची केज विधानसभा मतदारसंघातील पहिली सभा पार पडली. भव्य मोटारसायकल रॅलीने शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत करण्यात आले.

‘आमच्याकडे पवार साहेबांसारखा जाणता राजा आहे’

माध्यमात येणार्‍या गोष्टींपेक्षा जमीनीवरील परिस्थिती आज वेगळी आहे, असे जयंत पाटील म्हणाले. ‘पवारसाहेबांसारखा जाणता राजा आहे. शिवाय तरुण बहाद्दरांची फळी आमच्याकडे आहे. त्यातून आम्ही नवा महाराष्ट्र घडवल्याशिवाय राहणार नाही’, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व्यक्त केला. ‘पुरपरिस्थिती होती त्यामुळे मी शिवस्वराज्य यात्रेत नव्हतो. परंतु परिस्थिती निवळल्यानंतर आलो आहे’, असेही आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उघडा डोळे बघा नीट – धनंजय मुंडे

धुळे येथे मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये शिवस्वराज्य यात्रेवर त्यांनी टिका केली. ते शिवस्वराज्य यात्रेला प्रतिसाद मिळत नाही म्हणाले. मी गंगाखेड सभेचा फोटो तुम्हाला जे माध्यम आवडते त्यावर टाकला आहे. ‘उघडा डोळे बघा नीट’ असे जोरदार प्रत्युत्तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना अंबाजोगाईच्या जाहीर सभेत दिले. राज्याचा मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत खोटं बोलत असेल तर यासारखे मोठे दुर्दैव नाही. खोटं महाराष्ट्राच्या जनतेला बोलू नका. रोजगार देण्यात महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर आहे, असं तुम्ही सांगत आहात. अहो लाज वाटायला हवी तुम्हाला’, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. सुरुवातीला नोकरभरतीच्या जाहिराती येत होत्या आणि आज नोकरीतून काढल्याच्या येत आहेत. त्यामुळे विचार करा आता ३७० चा मुद्दा आणतील त्याकडे लक्ष देऊ नका, नाहीतर तुमचं काही खरं नाही हे लक्षात ठेवा, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे

…तोपर्यंत फेटा बांधणार नाही – खासदार डॉ. अमोल कोल्हे

‘परळी आणि केज मतदारसंघात आमचे आमदार जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत फेटा बांधणार नाही’, अशी प्रतिज्ञा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अंबाजोगाई येथील जाहीर सभेत केली. दरम्यान, ‘जेव्हा आमदार होतील त्याचवेळी या व्यासपीठावर येवून फेटा बांधेन’, असेही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर केले.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार विक्रम काळे, आमदार सतिश चव्हाण,महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे,नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, रेखा फड आदींसह अंबाजोगाई, केज मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here