कल्याणचा ब्रीज पूर्णच होईना!

kalyan durgadi bridge
कल्याणचा दुर्गाडी पूल (सौ. गुगल मॅप्स)

रस्ते, दुरुस्ती आणि बांधकामांसाठी अपेक्षित वेळेपेक्षा लागणारा वेळ आणि वर्षानुवर्षे रखडणारी कामे आता काही नवी नाहीत. पण कल्याणमधील रखडलेल्या एका पुलाचा फटका ठाणे, भिवंडी, कल्याण, शिळफाटा, नाशिक असा प्रवास करणाऱ्या तब्बल ५० हजार प्रवाशांना बसत आहे. कल्याणचा दुर्गाडी पूल २०१७ साली वापरासाठी खुला होणार होता, पण या पुलाच्या कामामागचं शुक्लकाष्ट संपत नसल्यामुळे आता हा पूल २०१९ साली तरी पूर्ण होणार का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

२ किमी पर्यंत वाहतूक कोंडी

कल्याण पश्चिमेकडे दुर्गाडी किल्ल्याजवळ जुना पूल होता. उल्हास नदीवरुन गेलेला हा पूल कल्याण ते मुंबई-नाशिक हायवे ते दुर्गाडी किल्ला असा होता. शिवाय राष्ट्रीय महामार्ग २२२ , कल्याण-शिळफाटा-भिंवडी रोड आणि ठाणे यांना जोडत होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा जुना पूल १० मे २००२ ला वापरासाठी खुला करण्यात आला. पण कालांतराने या पुलावर वाहनांची गर्दी होऊ लागली. आकडेवारीनुसार तब्बल ५० हजार गाडया दर दिवशी या पुलावरुन ये-जा करतात. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ लागली. त्यामुळे गरज पाहता हा नवा पूल बांधण्याचा विडा एमएमआरडीएने उचलला आणि ६ पदरी रस्ता बांधण्याचं काम या ठिकाणी सुरु करण्यात आलं.

kalyan durgadi old bridge
कल्याण दुर्गाडीचा जुना पूल
२०१६ ला झाली कामाला सुरुवात

कल्याणच्या दुर्गाडी पुलाचे काम एमएमआरडीए करतेय. एप्रिल २०१५ ला या पुलाचं काम सुरु होणं आणि २०१७ ला काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. पण या पुलाच्या कामाचं कंत्राट कोणाला द्यायचं हे ठरवण्यात वेळ गेला. जुलै २०१६ ला या कामाचा आराखडा एमएमआरडीएकडून मंजूर करण्यात आला. आणि सप्टेंबरनंतर पावसाला सुरुवात झाली. मे २०१७ मध्ये मेरिटाईम बोर्डाने या पुलाची लांबी आणि रुंदी वाढवायला सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा काम थांबले. नवा आराखडा तयार आणि मंजूर होईपर्यंत जून २०१७ उजाडला. त्यानंतर आता या ठिकाणी काम मंद गतीने सुरु आहे. आता हे काम २०१९ पर्यंत पूर्ण होईल असं सांगितलं जातंय.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here