घरमहाराष्ट्र'आम्हालाही जल्लोषाची तारीख सांगा'; MIMची पोस्टरबाजी

‘आम्हालाही जल्लोषाची तारीख सांगा’; MIMची पोस्टरबाजी

Subscribe

'मुस्लिम रिझर्व्हेशन - हमे भी हमे भी जश्न मनाने की तारीख बताओ' असा संदेश या पोस्टरवर लिहिण्यात आला होता.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा एकीकडे मार्गी लागत असताना आता मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा डोकं वर काढताना दिसत आहे. विधीमंडाळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यादरम्यान एमआयएमकडून मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी मागणी केली जात असल्याचं समोर आलं आहे. एमआयएमचे आमदार वारिस पठाण आणि इम्तियाज जलील यांनी विधीमंडळाच्या परिसरात पोस्टर झळकवत ही मागणी केली. ‘मुस्लिम रिझर्व्हेशन – हमे भी हमे भी जश्न मनाने की तारीख बताओ’ असा संदेश या पोस्टरवर लिहिण्यात आला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मुद्द्यावरुन आंदोलन काय करता, १ डिसेंबरला थेट जल्लोषच करा’ असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी केलं होतं. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा सकल क्रांती मोर्चाकडून आमरण उपोषण केले जात असताना, मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा केली होती. याच धर्तीवर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याची मागणी मान्य करावी असं आवाहन एमआयएमने केलं आहे.
याशिवाय वारिस पठाण यांनी याच मुद्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला आहे. ‘मुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण देत आहेत, त्यांना जल्लोष करण्याचं आवाहन करत आहेत. पण दुसरीकडे न्यायालयाने ठरवलेलं आरक्षण देत नाहीयेत’, असा आरोप पठाण यांनी केला आहे. मुस्लिम समाजाची अवस्था मराठा समाजापेक्षा वाईट आहे. तरीही हे सरकार त्यांच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहेत. मुस्लिम समाजाला डावलत आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारलं होतं, मात्र त्यांनी याविषयी बोलणं टाळलं असंही एमआयएमने म्हटलं आहे. दरम्यान, एमआयएमच्या आमदारांनी केलेल्या या पोस्टरबाजीला राजकीय वर्तुळातून काय उत्तर मिळणार हे येणारी वेळच सांगेल. दरम्यान, आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशन पुढील नऊ दिवस सुरु राहणार आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -