घरCORONA UPDATEकोरोनामध्ये साडेचार लाखांहून अधिक युनिट रक्त संकलन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोरोनामध्ये साडेचार लाखांहून अधिक युनिट रक्त संकलन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Subscribe

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्याने अनेक हॉस्पिटलमध्ये अत्यव्यस्थ रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू लागला होता. रक्ताअभावी रुग्णांचे प्राण गमावले जाऊ नये यासाठी राज्य सरकारने केलेल्या आवाहनाला राज्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यामध्ये साडे चार लाखांहून अधिक युनिट रक्त संकलन झाल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून देण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यात अडचण येऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून गृहनिर्माण संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, दहिहंडी पथके, सामाजिक, राजकीय, धार्मिक, चॅरिटेबल ट्रस्ट यांना रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला राज्यातील विविध संस्थांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मार्च ते ऑगस्टदरम्यान राज्यातून तब्बल ४ लाख ७७ हजार ६१३ युनिट रक्त संकलन झाले आहे. मार्चमध्ये सर्वाधिक १ लाख १० हजार ४३७ युनिट रक्त संकलन झाले. त्याखालोखाल जूनमध्ये ९९ हजार ६५८ आणि मे महिन्यामध्ये ९१ हजार १३७ युनिट रक्त संकलन झाले. राज्यात ऑगस्टमध्ये आलेल्या दहिहंडी व गणेशोत्सवादरम्यान अनेक मंडळांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यालाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ऑगस्टमध्ये राज्यभरातून तब्बल ६२ हजार युनिट रक्त संकलन झाले. मुंबईमध्येही लालबागचा राजा आणि सिद्धीविनायक न्यासाकडून कोरोना काळात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. लालबागचा राजा मंडळाने मार्चमध्ये १७५० युनिट तर सिद्धी विनायक न्यासाकडून एप्रिल ते जुलैदरम्यान १८४४ युनिट रक्त संकलन केले. लालबागचा राजा मंडळाने गणेशोत्सवामध्ये पुन्हा १० हजार २७२ युनिट रक्त रक्त संकलन केले. या दोन्ही मंडळाकडून मिळून १३ हजार ८६६ युनिट रक्त संकलन करण्यात आले. कोरोनासारख्या बिकट परिस्थितीमध्ये रक्तदान शिबिर आयोजकांनी व रक्तदात्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे राज्यामध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध झाल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचले.

- Advertisement -

दरवर्षी उन्हाळ्यामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात गावाला किंवा बाहेर फिरायला जात असल्याने रक्ताचा तुटवडा जाणवतो. मात्र यंदा मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने देशात लॉकडाऊन करण्यात आले. कोरोनासारख्या भयंकर परिस्थितीमुळे नागरिकांना घरातच थांबावे लागले होते. अशाही अडचणीच्या काळात संस्था व दात्यांनी पुढाकार घेत मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.

- Advertisement -

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनाला राज्यातील राजकीय, धार्मिक, गृहनिर्माण संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट, गणेशोत्सव मंडळ या रक्तदान शिबिर संयोजक आणि रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये संयोजकांकडून भरवलेल्या रक्तदान शिबिरामुळे पुरेसा रक्तसाठा उपलब्ध झाल्याने लाखो रुग्णांचे प्राण वाचले. त्याबद्दल त्यांचे आभार. भविष्यातही रक्तदाते आणि रक्तदान शिबिर संयोजकांनी अशाच प्रकारे सहकार्य करावे.
– डॉ. अरुण थोरात, सहाय्यक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -