जिल्हा बँकेचे 29 कोटींचे कर्जवाटप

जिल्ह्यातील 1318 शेतकर्‍यांना लाभ; सर्व बँकांना 3 हजार 303 कोटींचे उद्दिष्ट

नाशिक : आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून खरीप हंगामासाठी पीककर्जाचे वाटप सुरू झाले आहे. जिल्हा बँकेने जिल्ह्यातील एक हजार 318 शेतकर्‍यांना 29 कोटींचे कर्जवाटप केले आहे. यात सर्वाधिक पीक कर्जवाटप हे दिंडोरी तालुक्यात झाले आहे.
नोटाबंदी व थकबाकीमुळे जिल्हा बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. यातच राज्य शासनाने केलेल्या पीक कर्जाची तब्बल एक हजार कोटींची रक्कम न मिळाल्याने बँकेला आर्थिक चणचण भासत आहे. कर्जवसुली ठप्प असल्याने बँकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. मात्र, या परिस्थितीत जिल्हा बँकेने खरीप हंगामासाठी कर्जवाटप सुरू केले आहे. खरीप हंगामासाठी बँकेने यंदा 437 कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. 1 एप्रिलपासून बँकेने शेतकर्‍यांना पीक कर्जवाटप करण्यास प्रारंभ केला. आतापर्यंत बँकेने 29 कोटी 61 हजारांचे पीक कर्जवाटप केले आहे. पावसाला अद्याप सुरूवात झालेली नसल्याने पीक कर्ज मागणी कमी आहे. कर्ज वितरणात दिंडोरी तालुक्यात सर्वाधिक वाटप झाले आहे. त्यापाठोपाठ इतर तालुक्यांचा क्रमांक लागतो.

151 कोटींचे कर्जवाटप
यंदा खरीप हंगामासाठी राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांना तीन हजार 303 कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मागील आठवड्यात लीड बँकेसह प्रमुख सहकारी बँका, पतसंस्था व राष्ट्रीयकृत बँकांची बैठक घेतली होती. सर्व बँक मिळून 3 हजार 303 कोटी 75 लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र त्यापैकी फक्त 131 कोटींचे वाटप झाल्याचे बैठकीत समोर आले. ते बघता जिल्हाधिकारी मांढरे यांनी बँक प्रतिनिधींची कान उघडणी करत पीक कर्ज वाटपाची गती वाढवा, असे आदेश दिले होते. त्यानंतर पीक कर्ज वाटपाचा वेग वाढल्याचे चित्र दिसत आहे. बैठकीनंतर मागील चार दिवसात 20 कोटींचे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे.आतापर्यंत 151 कोटी 77 लाख 58 हजार रुपये कर्जवाटप झाले आहे.

कर्ज वाटपाचे बँकांचे उद्दिष्ट

  • राष्ट्रीयकृत बँका-2243.79 कोटी
  • खासगी बँका-605.74 कोटी
  • ग्रामीण बँका-16.84 कोटी
  • जिल्हा मध्यवर्ती बँक-437 कोटी