घरमहाराष्ट्रनाशिकसटाणा बाजार समितीला ठोकले ताळे

सटाणा बाजार समितीला ठोकले ताळे

Subscribe

शेतकर्‍यांचा रूद्रावतार; सचिवासह अधिकारी, कर्मचार्‍यांना कोंडले

सटाणा समितीच्या एका व्यापार्‍याने सात महिन्यापूर्वी दिलेले धनादेश बँकेत वठत नसल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी थेट बाजार समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाला टाळे ठोकून तब्बल चार तास सचिवासह अधिकारी व कर्मचार्‍यांना कोंडून ठेवले. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी शेतकरी आणि व्यापारी यांच्यात सकारात्मक चर्चा घडवून येत्या तीन महिन्यात कांद्याचे थकीत पेमेंट अदा करण्याच्या लेखी आश्वासन दिल्यानंतर कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले.

बाजार समितीतील गजानन ट्रेडिंग कंपनीचे संचालक आबा सोनवणे व पप्पू सोनवणे या व्यापार्‍यांनी गेल्या वर्षभरात सव्वाचारशे कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून कांदा खरेदी केला होता. दरम्यान, काळात वेळोवेळी आंदोलनाचे हत्यार उपसले. यामुळे बहुतांश शेतकर्‍यांचे कांदा पेमेंट अदा केले. मोठ्या रकमा असलेल्या शेतकर्‍यांचे पेमेंट धनादेशाद्वारे देण्यात आले . मात्र, शेतकर्‍यांचे चेक बँकेतून परत आल्यानंतर शेतकर्‍यांनी वेळोवेळी बाजार समिती प्रशासनाकडे संबंधित व्यापार्‍यांना नोटिसा देऊन त्याची खरेदी देखील बंद केली होती. सात महिने उलटूनही चेक वटत नसल्याने शेतकर्‍यांनी संबंधित व्यापार्‍यांची भेट घेऊन पैशांची मागणी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. संतप्त शेतकर्‍यांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास थेट बाजार समितीच्या मध्यवर्ती कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेतकर्‍यांनी एकच गोंधळ घातला आणि सचिव अधिकारी व कर्मचार्‍यांना कार्यालयात कोंडून मुख्य प्रवेशद्वाराला कुलुप लावत ठिय्या आंदोलन केले.

- Advertisement -

यावेळी बाजार समितीचे प्रभारी सभापती सरदार सिंह जाधव, संचालक तुकाराम देशमुख, केशव मांडवडे, जयप्रकाश सोनवणे, संजय बिरारी यांनी शेतकर्‍यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेणार नाही. अशी भूमिका घेतली. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आंदोलन करते शेतकरी संबंधित व्यापारी बाजार समितीचे सचिव भास्कराव तांबे यांच्याशी संयुक्त बैठक करून शेतकर्‍यांचे पैसे व्यापार्‍याने किती दिवसात आणि कसे परत करायचे, याबद्दल चर्चा झाली. यातून व्यापार्‍यांमार्फत तीन महिन्यात पेमेंट अदा करण्याबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात विलास रौंदळ, रवींद्र अहिरे, राजेंद्र आहिरे, कारभारी धोंडगे, सखाराम खैरनार, त्रंबक शेवाळे, एकनाथ खैरनार, श्रावण बोरसे, सुनील दाभाडे, कानू जाधव, शरद ठाकरे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -