नाशकात गॅस सिलिंडरचा तुटवडा

संततधार पावसाचा फटका,वितरकांकडून आश्वासन

Nashik

शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडरसाठी नोंदणी करूनही तीन-तीन दिवस ग्राहकांना सिलेंडर मिळत नसल्याने नाराजी पसरली आहे. सिलिंडरसाठी वितरकांकडे वारंवार सपर्क करावा लागत असल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस अनेक ग्राहकांनी वितरकांकडे सिलेंडरसाठी नोंदणी केली. मात्र, पाऊस व महापुराच्या कारणाने सिलिंडर पुरवठा करण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले जात होते. रविवार (ता.११) पासून पावसाने उघडीप दिल्याने शहरातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असली सिलिंडर पुरवठा यंत्रणा अद्याप पूर्वपदावर आलेली नाही. वितरकांकडून सिलिंडर कमी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एकच सिलिंडर वापरणार्‍या ग्राहकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. सिलिंडर नसल्याने शेजार्‍यांकडून सिलिंडर घ्यावे लागत आहे.

पंचवटी, आडगाव व म्हसरूळ परिसरात भारत गॅस एजन्सीकडून सिलिंडरचा पुरवठा केला जातो. ग्राहकांना तीन आठवड्यांपासून ही समस्या भेडसावत आहे. सिलिंडर पुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान आठवडा लागण्याची शक्यता लागणार असल्याचे वितरक सांगत आहेत. सिलिंडरची नोंदणी केल्यावर त्याचा पुरवठा होण्यासाठी किमान एक आठवड्याचा कालावधी लागत असून हा पुरवठा सुरळीत करण्याची ग्राहक करू लागले आहेत.

वितरकांनी दोन ते तीन दिवसात मिळेल असे संगितले

रविवारी सिलिंडर बुक केला आहे. वितरकांकडून तीन दिवस झाले तरी सिलिंडर मिळालेला नाही. शेजारच्यांकडून स्वयपाकासाठी सिलिंडर घेतला आहे. त्यामुळे आमची पर्यायी व्यवस्था झाली. वितरकांना संपर्क केला असता ते दोन दिवसांत सिलेंडर मिळेल, असे सांगतात. -मनीषा चव्हाण, ग्राहक

पावसाचा फटका

नाशिक शहरातील ग्राहकांना सिन्नर येथील भारत गॅसच्या प्लॅन्टमधून सिलिंडरचा पुरवठा केला जातो. या प्लॅन्टमध्ये मुंबईवरून टँकरमार्फत गॅस आणला जातो. कसारा घाटा परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून घाटात दरड कोसळत असल्याने सिलिंडरचा तुटवडा आहे. येत्या ५ ते ६ दिवसांत गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होईल. सिन्नर प्लॅन्टमध्ये मर्यादित सिलिंडर असल्याने तीन दिवसांनी पुरवठा होत आहे. सर्व ग्राहकांना सिलिंडर वितरित केले जाणार असून ग्राहकांनी काळजी करू नये, असे भारत गॅस पंचवटी वितरण केंद्राकडून सांगण्यात आले.