आदित्य ठाकरेंच्या दौर्‍यात चोरट्यांचा धुमाकूळ

मोबाईल, पैशांची चोरी; चोरट्यांची टोळी मेळाव्यात आल्याचा संशय

Nashik
theft

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा शनिवारी (ता.२०) दुपारी १ वाजता जनआशीर्वाद मेळावा खुटवडनगर येथील सिद्धी हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. ठाकरे यांच्या सोबत ताफा, सुरक्षारक्षक, पोलीस तैनात असतानाही चोरट्यांनी धारिष्ट दाखवत या मेळाव्यात धुमाकूळ घातला. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी पदाधिकारी व नेत्यांचे मोबाईल व रोकड लंपास केली. पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली आहे. मेळाव्यात चोरट्यांची टोळी आली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. विठ्ठल जाधव (बीड), बिलाल नदीम खान (मालेगांव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद मेळाव्यासाठी सिद्धी हॉलमध्ये शिवसेनेच्या नेत्यांसह नगरसेवक व शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. या गर्दीचा फायदा उठवत चोरट्यांनी मेळाव्यात पाचजणांचे मोबाईल लंपास केले. रामदास शांताराम अहिरे (रा.मुंडेवाडी, पाथर्डी) यांच्या खिशातील २६ हजार रूपयांची रोकड लंपास केली. तसेच नगरसेवक दीलीप दातीर यांच्या खिशात हात घालून चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही बाब दातीर यांच्या लक्षात येताच चोरटयाने पळून जाण्याचा प्रयत्न गेला. दातीर यांनी चोरट्याला पकडत अंबड पोलिसांच्या ताब्यात दिले. मेळाव्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. याप्रकरणी रामदास अहिरे यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पुढील तपास पोलीस हवालदार मल्ले करीत आहेत.