Coronavirus: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्याला कोरोनाचा संसर्ग

Mumbai
one positive corona patient in ahmednagar
प्रातिनिधिक छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या एका महिला नेत्याला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या महिला नेत्या आमदार असून गुरुवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात काल २,५९८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून आता एकूण रुग्णसंख्या ५९,५४६ वर पोहोचली आहे, तर मृतांचा आकडा १,९८२ वर गेला आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना या महिला आमदाराने सांगितले की, माझ्यासह माझ्या कुटुंबातील तिघांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. मुंबईत एक अंत्यसंस्काराला हजेरी लावली असताना कदाचित हा संसर्ग झाला असावा, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. या महिला नेत्या गेल्या काही दिवसांपासून क्वारंटाईन आहेत.

या महिला आमदार राज्यातील तिसऱ्या आमदार आहेत ज्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. याआधी कळवा-मुंब्राचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना संसर्ग झाला होता. तर आता सध्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री असलेल्या नेत्याला देखील संसर्ग झालेला आहे. या मंत्र्यावर सध्या मुंबईत उपचार सुरु आहेत. तर राष्ट्रवादीच्या या महिला आमदार कोणत्या ठिकाणी उपचार घेतायत, याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.