घरमहाराष्ट्रनाशिकमोदींच्या 'डिजिटल इंडिया'ला नाशिक मनपामध्ये हरताळ; ॲप गायब

मोदींच्या ‘डिजिटल इंडिया’ला नाशिक मनपामध्ये हरताळ; ॲप गायब

Subscribe

नाशिक महापालिकेचे 'इ- कनेक्ट अ‍ॅप' अचानकपणे गुगल प्ले स्टोअरवरुन गायब झाले आहे. महापालिका प्रशासनाने तांत्रिक कारणाकडे अंगुली निर्देश करीत हे अ‍ॅप तात्पुरते बंद झाल्याची कबुली दिली आहे.

नवीन भारत आणि डिजिटल इंडियाचा पुरस्कार करणारे भाजपाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेचा भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यानंतर अवघ्या काही वेळातच भाजपाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेत पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियाला हरताळ फासण्याचे काम केले आहे. वर्षभरात ३७ हजार नागरी तक्रारी प्राप्त झालेले महापालिकेचे ‘इ- कनेक्ट अ‍ॅप’ अचानकपणे गुगल प्ले स्टोअरवरुन गायब झाले आहे. महापालिका प्रशासनाने तांत्रिक कारणाकडे अंगुली निर्देश करीत अ‍ॅप तात्पुरते बंद झाल्याची कबुली दिली असली तरीही तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरु केलेले कोणतेही काम अस्तित्वातच ठेवायचे नाही, असाच जणू विडा प्रशासनातील मुखंडांनी उचललेला दिसतो. त्यातूनच हे अ‍ॅप्लीकेशन ‘गुगल प्ले’ स्टोअरवरुन काढण्यात आल्याची चर्चा आहे.

एनएमसी इ कनेक्ट अॅप

सध्या महापालिका मुख्यालय, विभागीय कार्यालय, उपकार्यालय या ठिकाणी एकूण २२ नागरी सुविधा केंद्रे कार्यान्वित आहेत. पालिकेच्या वेगवेगळ्या विभागांतील अत्यावश्यक सेवांचे संगणकीकरण करून त्या नागरी सुविधा केंद्रांमार्फत पुरविण्यात येत आहेत. याआधी काही सेवा ऑनलाइन करण्यात आल्या. या सेवा देताना निश्चित कार्यपद्धती नसल्याने प्रत्येक विभागीय कार्यालय वेगवेगळी प्रक्रिया राबवीत होते. प्रत्येक विभाग प्रत्येक सेवेकरिता कमी-अधिक कागदपत्रांची मागणी करत असे. यामुळे नागरी सेवा पुरविण्याच्या कामात एकसमानता नव्हती. याबाबी लक्षात घेऊन सेवेत समानता प्रस्थापित करत ते अधिक गतिमान, परिणामकारक करण्याची संकल्पना प्रथमत: तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी मांडली. स्मार्ट नाशिक अ‍ॅपव्दारे या संकल्पनेला मूर्त रुप आले. त्यात अधिक सुधारणा करीत तुकाराम मुंढे यांनी अ‍ॅप्लीकेशनला ‘एनएमसी इ कनेक्ट’ नाव दिले. सेवेसाठी नागरी सेवा हमी कायद्यानुसार कालावधी निश्चित करण्यात आला. त्यानुसार संबंधित विभागाला अर्जावर कार्यवाही करणे बंधनकारक केले. तसे न झाल्यास अर्ज वरिष्ठ अधिकार्‍याकडे वर्ग केला जात. संबंधित अधिकारी, कर्मचार्‍याला आपोआप कारणे दाखवा नोटीस बजावली जात. त्यामुळे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचार्‍याला नागरी तक्रारींची दखल घेऊन तिचे निराकरण करावे लागत होते. मात्र हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरुनच गायब झाले आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला हे अॅप घ्यायचे असल्यास त्या व्यक्तीला ते अॅप घेता येणार नसल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

सुमारे १ लाख लोकांनी केलेअ‍ॅप डाऊनलोड

शहरातील सुमारे १ लाख नागरिकांनी एनएमसी ई-कनेक्ट हे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले आहे. यापूर्वी, अस्तित्वात असलेले स्मार्ट नाशिक अ‍ॅप हे ५२ हजार लोकांनी डाऊनलोड करून घेतले होते.

वर्षभरात ३७ हजार तक्रारींचा निपटारा

तुकाराम मुंढेंच्या चांगल्या प्रकल्पांचे अस्तित्व मिटवण्याचा घाट घातल्याचे दिसून येत आहे. या अॅपद्वारे वर्षभरात ३७ हजार समस्या सोडवण्यात आल्या होत्या. मात्र हे अॅप गुगल प्लेवरुन हटवल्याचे बोले जात आहे.

- Advertisement -

आतली बातमी

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिक महापालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नवी मुंबईच्या धर्तीवर एनएमसी ई-कनेक्ट हे मोबाइल अ‍ॅप १ मार्चपासून २०१८ पासून कार्यान्वित केले. या अ‍ॅपवर तक्रारी केल्यानंतर त्या सोडविण्यासंबंधीचा कालबद्ध कार्यक्रमही त्यांनी आखून दिला. यात कामचूकारपणा करणार्‍यांवर कडक कारवाई केली जात. मुंढे यांच्या बदलीनंतर महापालिकेत रुजू झालेले राधाकृष्ण गमे यांनीही हे अ‍ॅप त्याच गतीने सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न केलेत. मात्र मुंढे यांनी निर्माण केलेला आदरयुक्त धाक गमे यांना टिकवून ठेवता आला नाही. त्यामुळे अ‍ॅपवर येणार्‍या तक्रारींकडेही दुर्लक्ष केले गेले. बर्‍याचदा तक्रार केल्यानंतर संबंधित तक्रारदाराला मोबाइलवर संपर्क साधून लवकरच तुमच्या तक्रारीचा निपटारा केला जाईल अशी ग्वाही दिली जात व प्रकरण अ‍ॅपवरुन थांबवले जात. मात्र गमे यांना ही बाब लक्षात आल्यानंतर आचारसंहितेच्या काळात त्यांनी अधिक कटाक्षाने अ‍ॅपकडे लक्ष दिले. त्यातूनच कथीत कारवाई टाळण्यासाठी तसेच कर्तव्यात कसूर करता येण्यासाठी काही अधिकार्‍यांनी ‘रिंग’ करुन हे अ‍ॅप्लीकेशन गुगल प्ले स्टोअरवरुन हद्दपार केल्याची चर्चा आहे. पूर्वी ज्यांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे, त्यांना मात्र तक्रार करण्यास कोणतीही अडचण नाही, असे महापालिकेतील आयटी विभागातील सूत्रांनी सांगितले.

अ‍ॅपची अशी आहे प्रणाली

नागरिकांना सहजतेने तक्रार करता येईल, अशी प्रणालीची रचना आहे. तक्रार नोंद झाल्यावर संबंधित अधिकार्‍यावर ती २४ तासांच्या आत बघून कार्यवाही करणे बंधनकारक आहे. या काळात कार्यवाही सुरू न झाल्यास ती तक्रार आपोआप वरिष्ठांकडे वर्ग होते. वर्ग होताना कार्यवाही न करणार्‍या पहिल्या अधिकार्‍याला स्वयंचलित कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. तक्रार निराकरणासाठी सात दिवसांचा कालावधी दिला गेला आहे. निराकरण झाल्यावर नागरिकांना अभिप्राय आणि संबंधित अधिकार्‍याच्या कामाचे मूल्यमापन करून गुणांकन करता येते. याद्वारे विभागनिहाय तक्रारी, अधिकार्‍यांचे काम याची स्वयंचलित पडताळणी होते. दर सप्ताहात दाखल होणार्‍या आणि निराकरण झालेल्या तक्रारींचा आढावा खुद्द आयुक्तांकडून घेतला जातो.

सुमारे १ लाख लोकांनी अ‍ॅप डाऊनलोड केले

शहरातील सुमारे १ लाख नागरिकांनी एनएमसी ई-कनेक्ट हे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले आहे. यापूर्वी, अस्तित्वात असलेले स्मार्ट नाशिक अ‍ॅप हे ५२ हजार लोकांनी डाऊनलोड करून घेतले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -