घरमहाराष्ट्रतुकाराम मुढेंविरोधात नाशिकमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक, अविश्वास प्रस्ताव तयार

तुकाराम मुढेंविरोधात नाशिकमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक, अविश्वास प्रस्ताव तयार

Subscribe

नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले असून अविश्वास प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव महापौर रंजना भानसी यांच्याकडे सादर करण्यात आला असून त्यावर निर्णय घेण्यासाठी महापौरांनी महत्त्वपूर्ण बैठकही बोलावली आहे.

आपल्या कामाच्या वेगळ्या पद्धतीमुळे प्रसिद्ध असलेले नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुढेंविरोधात आता नाशिकमध्येही लोकप्रतिनिधींचं एकमत होऊ लागलं आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे नाराज झालेल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आता त्यांच्याविरोधात बंडाचा झेंडा उभारला आहे. या पार्श्वभूमीवर तुकारम मुंढेंविरोधात पालिकेत थेट अविस्वास ठराव आणण्याची तयारी नाशिक महानगर पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी चालवली आहे. तसा प्रस्तावच महापौर रंजना भिसे यांच्याकडे आला असून विशेष म्हणजे महापौरांनीही तुकारम मुंढेंच्या कामाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त करत अविश्वास प्रस्तावाला समर्थन दिलं आहे.

कामाच्या पद्धतीमुळे नगरसेवकांची नाराजी

तुकाराम मुंढे नवी मुंबई महानगरपालिकेत असताना तिथे देखील त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे राजकीय लोकप्रतिनिधी नाराज होते. नुकतीच त्यांची बदली नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. नाशिकमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी करवाढीचा मुद्दा असो किंवा अनधिकृत बांधकामांचा मुद्दा असो, कठोर भूमिका घेत पावले टाकली आहेत. मात्र, यामुळे त्यांच्या विरोधात राजकीय प्रतिनिधींमध्ये नाराजी आणि विरोधाचा सूर निर्माण होऊ लागला. आणि अखेर त्यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव तयार करण्यात आला.

- Advertisement -

अविश्वास प्रस्ताव महापौरांकडे सादर

करवाढीच्या मुद्द्याचं भांडवल करून प्रथम नाशिक महानगर पालिकेतील भाजपसोबतच सर्वपक्षीय नगरसेवकांनी तुकाराम मुंढेंविरोधात आघाडी उभारली आहे. आयुक्त हेकेखोर असून हुकूमशाही पद्धतीने काम करत असल्याची भावना हे सर्वपक्षीय नगरसेवक व्यक्त करत आहेत. दरम्यान, स्थायी समितीच्या बैठकीत तुकाराम मुंढेंविरोधातल्या अविश्वास प्रस्तावाची प्रत तयार करण्यात आली असून त्यावर स्थायी समितीच्या अध्यक्षांसह १५ सदस्यांची स्वाक्षरी देखील आहे. ही प्रत महापौर रंजना भानसी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भात महापौर विशेष बैठक बोलावणार असून त्या बैठकीतच पुढील कार्यवाहीची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोण आहेत तुकाराम मुंढे?

तुकाराम मुंढे हे मूळचे बीडचे असून २००५ सालच्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. नोकरीत रुजू झाल्यापासून त्यांच्या अनेकदा बदल्या करण्यात आल्या आहेत. आणि बहुतांश वेळी त्यांच्या कामकाजाची पद्धत स्थानिक राजकारण्यांना न पटल्यामुळे बदली झाल्याचंही बोललं जात आहे. २०१६मध्ये ते नवी मुंबईचे आयुक्त म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी अनधिकृत बांधकामांविरोधात उघडलेल्या मोहिमेमुळे सर्वांच्या पाचावर धारण बसली होती. कामचुकारपणामुळे तब्बल ८०० कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कामावरून बडतर्फ करण्याचा त्यांचा निर्णय विशेष चर्चेत आणि त्यामुळेच वादात आला होता. मात्र, तिथूनही त्यांची बदली करून त्यांना पुण्यात पाठवण्यात आलं. अखेर पुण्यातून मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहाखातर त्यांची बदली नाशिकचे आयुक्त म्हणून करण्यात आल्याचं सांगितलं गेलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -