‘संभाजी बिडी’ उत्पादक कंपनीचा मोठा निर्णय, लवकरच नवीन नाव जाहीर होणार!

Sambhaji Bidi
Advertisement

गेल्या अनेक दिवसांपासून ‘संभाजी बिडी’ वरून सुरू असलेला वाद आता शमला आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्या नावावर असणाऱ्या संभाजी बिडीमुळे छत्रपती संभाजी राजे यांचा अवमान होत असल्याची तक्रार गेल्या अनेक वर्षांपासून संभाजी ब्रिगेडकडून केली जात होती. त्यावरून अनेक शिवप्रेमींनी देखील वारंवार नाराजी व्यक्त केली होती. राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील यासंदर्भात आग्रही भूमिका मांडली होती. अखेर त्या प्रकरणाचा आता सोक्षमोक्ष लागलेला असून यासंदर्भात संभाजी बिडीचं उत्पादन करणाऱ्या पुण्याच्या साबळे वाघिरे कंपनीने परिपत्रक काढलं असून लवकरच संभाजी बिडीचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचं त्यात स्पष्ट करण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजी राजे यांच्या नावाचा वापर बिडीसारख्या नशेच्या वस्तूवर असणं हा त्यांचा अपमान असल्याची भूमिका शिवप्रेमींकडून सातत्याने मांडली जात होती. संभाजी ब्रिगेडने यामध्ये आक्रमक भूमिका घेतली होती. या पार्श्वभूीवर अखेर साबळे वाघिरे कंपनीने निर्णय घेतला आहे. मात्र, नाव बदलण्याच्या प्रक्रियेला काही कालावधी लागेल, असं देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

‘संभाजी राजांबद्दलच्या आदरापोटीच नाव’

यासंदर्भात परिपत्रक जाहीर करून कंपनीने आपलं मत मांडलं आहे. ‘याआधी देखील जेव्हा अशा प्रकारचा आक्षेप घेण्यात आला, तेव्हा आम्ही आमच्या बिडी उत्पादनाच्या नावातून ‘छत्रपती’ हा शब्द आणि संभाजी राजांचा फोटो काढला होता. हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय असून आमच्या वडिलांनी संभाजी राजांबद्दलच्या आदरापोटी हे नाव दिलं होतं. मात्र, लोकभावनेसमोर आमची भूमिका सकारात्मक आहे. त्यामुळे आम्ही आता उत्पादनाचं पूर्ण नावच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासाठीच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी काही कालावधी लागेल, याची देखील नोंद घ्यावी. हा कंपनीत काम करणाऱ्या ६० ते ७० हजार कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. नाव बदलल्यामुळे आमच्या कामगिरीवर परिणाम होईल. त्यामुळे योग्य त्या बाबींची पूर्तता केल्यानंतर हे नाव बदलण्यात येईल’, असं कंपनीकडून जाहीर करण्यात आलं आहे.