Friday, August 7, 2020
Mumbai
28.8 C
घर महाराष्ट्र पवारांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर!

पवारांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर!

राफेल विमानांवरून पंतप्रधानांना क्लीनचिट देणाच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यांवर खुलासे करता करता त्या पक्षाच्या प्रवक्त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. पक्षाचे खासदार तारिक अन्वर यांनी खासदारकीबरोबरच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने तर पक्षाची अवस्था अधिकच बिघडली आहे.

Mumbai
Sharad pawar wari
ज्येष्ठ नेते शरद पवार

राफेल विमानांवरून पंतप्रधानांना क्लीनचिट देणाच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यांवर खुलासे करता करता त्या पक्षाच्या प्रवक्त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. पक्षाचे खासदार तारिक अन्वर यांनी खासदारकीबरोबरच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने तर पक्षाची अवस्था अधिकच बिघडली आहे. पक्ष नेत्यांबरोबरच सामान्य कार्यकर्तेही पवारांच्या वक्तव्याने बुचकळ्यात पडले आहेत.  माध्यमांमध्येही राष्ट्रवादीची चांगलीच खेचली जाऊ लागल्याने पक्ष नेत्यांची बोलती बंद झाली आहे. एकूणच पवारांच्या मोदींना क्लिनचिट देण्याच्या कृतीने पक्ष बॅकफूटवर आला आहे.

विरोधकांची झाली गोची

फ्रान्सकडून खरेदी करायच्या राफेल विमानांच्या संशयास्पद डीलप्रकरणी विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोपाची राळ उडवली असताना विरोधी पक्षांचे आधारस्तंभ असलेल्या शरद पवार यांनी मोदी यांच्या हेतूबद्दल शंका नसल्याचं वक्तव्य करत विरोधी नेत्यांना एकच हादरा दिला. ‘आयबीएन लोकमत’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी मोदींना प्रशिस्तीपत्र दिले होते. एकीकडे विरोधकांनी राफेलच्या विषयावर देशभर आंदोलने सुरू केली असताना पवारांनी अचानक केलेल्या या वक्तव्यांमुळे विरोधकांच्या शिडातील हवा निघून जाऊ लागली आहे. भाजपने तर पवारांच्या या वक्तव्याची खुबीने जाहिरातबाजी सुरू केली आहे. भाजपने राफेलवरील आरोपांमधील जोर कमी करायला सुरुवात केली आहे. पवार यांचे हे वक्तव्य अवसानघातकी असल्याचा आरोप करत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार तारिक अन्वर यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.  पक्ष सदस्यत्वही सोडलं आहे. अन्वर यांच्या या भूमिकेने पक्षाचे नेते चांगलेच हादरले आहेत.


तुम्ही हे वाचलंत का? – ‘फक्त फसवू नका’, उदयनराजेंनी शरद पवारांना सुनावलं!


खुलासे करता करता नेत्यांची दमछाक!

माध्यमांमध्येही याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामुळे पक्षाची चांगलीच अडचण झाली आहे. पक्ष प्रवक्त्यांची खुलासे करता करता चांगलीच दमछाक होत आहे. राज्य प्रवक्ते असलेल्या नवाब मलिक यांनी पवारांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आल्याचा दावा केला आहे. तर पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख फौजिया खान यांनीही पवार तसे बोललेच नसल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आल्याचा आरोप खान यांनी केला आहे. पक्षाच्या खासदार आणि पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनीही मोदींना कुठेही क्लिनचिट देण्यात आलेली नाही, असं सांगण्याचा प्रयत्न केला. तर ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, पवारांनी नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी राफेलबाबत मोदींना क्लीनचिट दिली.