घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टराजस्थानातील राजकीय वातावरण अस्पष्टच

राजस्थानातील राजकीय वातावरण अस्पष्टच

Subscribe

राजकीय पटलावर राजस्थान हे राज्य नेहमी अस्थिर राहिले आहे. इथे काँग्रेस आणि भाजप हे दोनच मोठे पक्ष आहेत. मात्र राज्यातील जनता कधीच या दोन पक्षांना आपली वाटली नाही. एकदा काँग्रेस तर एकदा भाजप, असे कायम आलटून पालटून या राज्यातील जनता या दोन्ही पक्षांच्या पारड्यात जनाधार टाकत असते. त्यामुळे २०१९च्या लोकसभेसाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी जरी जोरदार तयारी केली असली तरी जनतेच्या मनात नेमके काय आहे, हे कदापी सांगता येणार नाही. २००४ च्या लोकसभेत राजस्थानातील नागरिकांनी भाजपला सर्वाधिक जागा दिल्या होत्या, २००९ मध्ये काँग्रेसला दिल्या, २०१४ मध्ये भाजपला सर्वच्या सर्व जागा दिल्या. त्यामुळे २०१९मध्ये काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कारणही तसेच आहेत. २०१३ च्या विधानसभेत भाजपला सत्ता देणार्‍या राजस्थानातील मतदारांनी २०१९च्या लोकसभेच्या आधी २०१८ला झालेल्या विधानसभेत काँग्रेसला सत्तेवर बसवले आहे.

राजस्थान हे असे राज्य आहे, ज्यामध्ये नेहमी सत्ता बदल होत आला आहे. कुणीही ठाम मत या राज्याविषयी मांडू शकत नाही. स्वातंत्र्यानंतर २० वर्षेे काँग्रेसने देशभर राज्य केले, तसे राजस्थानातही काँग्रेस अग्रेसर राहिली, मात्र त्यानंतर या राज्यातील राजकारण कायम अस्थिर राहिले, कुणालाही कायम मत्ताधिक्य मिळाले नाही. राजस्थानातील जनता एकप्रकारे सजग आणि सुबुद्ध बनली असेे काहीसे वाटू लागले. पुढे या राज्यात काँग्रेस विरोधात भाजप, जनता दल, सीपीआय या पक्षांनी लोकसभेच्या जागांवर अधिकार मिळवला. तेव्हापासून काँग्रेस आणि भाजप यांना या राज्यात आलटून पालटून लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळू लागल्या. सर्व राजकीय पक्षांचे आता हेच दुखणे बनले आहे. या ठिकाणच्या जनतेच्या मनात काय आहे, याचा अंदाज राजकीय पक्षांना अजिबात येत नाही. ही अस्थिरता विधानसभा असो किंवा लोकसभा निवडणूक असो, कायम असते. १९७१पर्यंत सलग ५ लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थानात सर्वाधिक लोकसभेच्या जागा जिंकणार्‍या काँग्रेसला १९७७ मध्ये अवघी १ जागा मिळाली. राजस्थानातील नागरिकांनी २५ पैकी २४ जागा भाजपच्या पारड्यात टाकल्या. पुन्हा पुढच्या तीन लोकसभांमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली, त्यानंतर भाजप अव्वल ठरला. १९९९ आणि २००४ मध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. पुढे २००९ मध्ये काँग्रेस अव्वल ठरली. २०१४ मध्ये मोदी लाटेत राजस्थानच्या सर्व लोकसभेच्या जागा भाजपने जिंकल्या. त्यानंतर २०१९च्या लोकसभेच्या आधी २०१८ मध्ये राजस्थानात विधानसभा निवडणूक झाली. ज्यामध्ये मात्र काँग्रेसने सर्वाधिक १०० जागा जिंकल्या, तर भाजपला ७३ जागा मिळाल्या. त्यामुळे राजस्थान लोकसभेचे वारे काय असणार याचा प्राथमिक अंदाज आला आहे.

- Advertisement -

२०१९मध्ये काँग्रेस आणि भाजप यांना समान जागा मिळतील किंवा २-४ फरकाने कमी-अधिक मिळतील. मात्र भाजपचा जनाधार घटेल, हे निश्चित आहे. काँग्रेसचे राजस्थानातील नेतृत्त्व करणारे अशोक गेहलोत आणि भाजपच्या वसुंधरा राजे यांच्या प्रभावाखाली लोकसभेची निवडणूक होईल, तेव्हा चित्र काय असेल, ते निवडणुकीनंतरच कळेल. लोकसभा निवडणूक जाहीर झाली, मतदान काही आठवड्यांवर येऊन ठेपले आहे. अशा स्थितीत मात्र अजूनही राज्यात निवडणुकीची लगबग दिसत नाही. राजस्थानात मागील ४ लोकसभा निवडणुका काँग्रेस आणि भाजप या दोनच पक्षांमध्ये लढल्या गेल्या आहेत. यंदा २०१९मधील लोकसभा निवडणूकही याच दोन पक्षांमध्ये लढली जाणार आहे.

भाजपने ९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून २४ ते २७ मार्च दरम्यान राज्यातील सर्व लोकसभा मतदार संघांमध्ये पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी हे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. तसेच ठिकठिकाणी विजय संकल्प सभांचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारे भाजपने काँग्र्रेसच्या आधीच निवडणुकीची तयारी जोरदार सुरू केली आहे. मात्र काँग्रेसची अजून एकही यादी जाहीर झालेली नाही. २६ मार्चपासून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी राज्याच्या दौर्‍यावर येणार आहेत, त्यानंतर ही यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढे राहुल गांधी यांच्या सभाही होणार आहेत. सध्या तरी राज्यात काँग्रेस प्रत्येक लोकसभा मतदार संघात उमेदवार देतांना प्रचंड सावधगिरी बाळगत आहे. राज्याची विधानसभा निवडणूक जिंकल्यामुळे काँग्रेसचा राज्यात आत्मविश्वास वाढलेला आहे. या आत्मविश्वासाच्या जोरावर राज्यात लोकसभा निवडणुकीला सामोरे जातांना भाजपला मात देण्याचा मनसुबा काँग्रेसचा आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा हेदेखील प्रत्येक राज्यावर लक्ष ठेवून आहेत. त्याप्रमाणे राजस्थानातही घटलेला जनाधार पुन्हा वाढवण्यासाठी भाजप २०१९ची लोकसभा निवडणूक एक आव्हान म्हणून पाहणार आहे. असे असले तरी राजस्थानातील जनतेच्या मनात नेमके काय आहे, हे निवडणुकीच्या शेवटापर्यंत कुणालाच सांगता येणार नाही, हेच खरे.

- Advertisement -

५८ वर्षांचा लोकसभा निवडणुकीचा इतिहास
1951 पासून १९७१ पर्यंत राजस्थानात लोकसभेच्या सर्वाधिक जागा काँगे्रेसने जिंकल्या होत्या. १९७७ ला प्रथम भाजपने काँग्रेसवर मात करत २५ पैकी २४ जागा जिंकल्या, काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली, मात्र काँग्रेसने पुन्हा मुसंडी मारून १९८० आणि १९८४ मध्ये काँगे्रस अव्वल ठरली. १८८५ मध्ये तर सर्वच्या सर्व २५ जागा काँग्रेसने जिंकल्या. त्यानंतर १९८९मध्ये भाजप+जनता दल+सीपीआय (मार्क्सवादी) यांची युती झाल्याने या युतीने सर्व जागा जिंकल्या. १९९१ पासून १९९८पर्यंत तीन वेळा मुदतपूर्व लोकसभा झाली. त्यातही काँग्रेस अव्वल होती. १९९९ आणि २००४ मध्ये मात्र भाजपने जास्त जागा जिंकल्या. २००९ मध्ये मात्र पुन्हा काँग्रेस अव्वल ठरली, मात्र २०१४ मध्ये मोदी लाट होती, त्यामुळे भाजपने येथील सर्वच्या सर्व जागा जिंकल्या.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -