घरमहाराष्ट्रलेन तोडतील तर पुढील टोल नाक्यावर लगेचच भरावा लागणार दंड

लेन तोडतील तर पुढील टोल नाक्यावर लगेचच भरावा लागणार दंड

Subscribe

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर देशातला पहिला आयटीएमएस

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर लेन कटिंग, ओव्हर स्पिडिंग यांसारखे वाहतुकीचे नियम मोडल्यास त्यासाठीचा तुम्हाला पुढे येणार्‍या टोल नाक्यावरच दंड भरावा लागणार आहे. बेशिस्त वाहन चालवल्यानंतर वाहन चालकांना एसएमएसही मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारीत हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम राबविण्याचे ठरविले आहे. इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) अंतर्गत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पहिल्यांदाच देशात अशा स्वरूपाचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. महामार्गावरील अपघात कमी करण्याच्या उद्देशानेच असा पहिला प्रकल्प राबवण्यात येणार आहे. एकूण १६८ कोटी रूपये या संपूर्ण प्रकल्पासाठी खर्च करण्यात येणार आहेत.

आयटीएमएस प्रकल्पांतर्गत संपूर्ण एक्सप्रेसच्या दोन्ही दिशेच्या मार्गावर एकूण २७ स्पीड डिटेक्शन कॅमेरा बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे १०० पेक्षा अधिक वेगाने धावणार्‍या वाहनांच्या गाडीची नंबर प्लेट टिपणे शक्य होणार आहे. तसेच २८ ठिकाणी लेन डिसिप्लीन व्हायलेशन सिस्टिम अंतर्गत कॅमेरा बसवण्यात येतील. त्यामुळे लेन कटिंगसारख्या वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाची नोंद ठेवणे शक्य होईल. ऑटोमॅटिक नंबर प्लेट डिटेक्शन सिस्टिमही या प्रणालीचा भाग आहे.

- Advertisement -

तसेच ऑटोमॅटिक व्हेईकल काऊंटर अ‍ॅण्ड क्लासिफायरचा वापरही वाहनांची वर्गवारी करण्यासाठी होईल. छोटी वाहने तसेच माल वाहतूक करणारी वाहने यांची वर्गवारी करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. जनरल सर्व्हेलन्स सिस्टिम अंतर्गत फुड मॉल्स आणि पेट्रोल पंप या ठिकाणी एकूण ७६ कॅमेरे लागणार आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर एकूण ११ ब्लॅक स्पॉट्स आहेत. ही संपूर्ण यंत्रणा आगामी दहा वर्षांत कार्यरत होणार आहे. तसेच येत्या ८ ते ९ महिन्यांत या कामांसाठी एजन्सीची नेमणूक करण्यात येऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणे अपेक्षित आहे.

हवामानाचा अंदाज कळणार
अनेदा घाट परिसरात तसेच लोणावळ्यासारख्या ठिकाणी प्रचंड धुके असते. त्यामुळे कमी व्हिजिबिलीटीमुळे अनेकदा अपघातही होतात. ते टाळण्यासाठी हवामानाचा अंदाज देणे हा या सिस्टिमचा एक भाग असेल. अनेक ठिकाणी एलईडी पॅनेलच्या माध्यमातून याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणार्‍या वाहनांना टोल प्लाझावरच मज्जाव करण्यात येणार असून घाटात जाऊ दिले जाणार नाही. त्यासाठी ४३ टोल बुथवर वेट मोशन सेन्सर बसविण्यात येतील.

- Advertisement -

बेशिस्तीसाठी कापणार चलान
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहतुकीचा नियम मोडल्यानंतर त्यासाठीचे चलान लगेचच तयार होणार आहे. वाहन चालकाने केलेल्या गुन्ह्याचा फोटोचा पुरावा म्हणून चलानसोबत असणार आहे. त्यासाठी टोल प्लाझाच्या ठिकाणी सेल्फ किऑस्क मशीनही बसवण्यात आली आहे. या मशीनवर आपण कोणत्या ठिकाणी कोणता वाहतुकीचा नियम मोडला याबाबतची माहिती मिळेल. तसेच फुड मॉल्स आणि टोल बुथ याठिकाणी १४ सेल्फ किऑस्क मशीन बसवण्यात येणार आहेत. टोल प्लाझावर दंड भरला नाही तर ई-चलान वाहन चालकाला पाठवण्यात येणार आहे.त्यामुळे प्रवास पूर्ण झाल्यानंतर आपल्या नावे कोणते चलान तयार झाले आहे का याची खातरजमा वाहन चालकांना करावी लागणार आहे. यासाठीचे एसएमएस नोटीफिकेशनही वाहन चालकांना मिळणार आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहन चालकांमध्ये शिस्त वाढते आहे का? अपघाताचे प्रमाण कमी होते आहे का? हा पुढच्या टप्प्यातील अभ्यासाचा विषय असेल. अनेक ठिकाणी रस्ते हे चार लेनचे झाल्याने तसेच त्याठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने पुढच्या टप्प्यात मुंबई -नाशिक, मुंबई-अहमदाबाद, पुणे-सातारा, पुणे-नाशिक, पुणे-कोल्हापूर तसेच मुंबई-पुणे जुना हायवेवर आयटीएमएसची अंमलबजावणी होणार आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -