Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर महामुंबई शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये संभ्रम

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये संभ्रम

काँग्रेसमध्ये दोन गट कायम, तर राष्ट्रवादीच्या अटी-शर्ती

Mumbai

महाराष्ट्रात सत्तास्थापनाचे संघर्ष अद्याप कायम असताना रविवारी भाजपाने सरकार स्थापनेस नकार दिल्याने राज्यात नवे राजकीय वादळ उठले आहे. या वादळात सर्वांचे लक्ष आता महाआघडीच्या भूमिकेवर लागून राहिले आहे. मात्र शिवसेनेला पाठींबा देण्यावरुन महाआघाडीच्या नेत्यांमध्ये अद्याप संभ्रम कायम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रविवारी पुन्हा एकदा आपण विरोधी बाकांवर बसणार असल्याचे जाहीर केल्याने नवा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

शिवसेनेला पाठींबा देण्यावरुन काँग्रेस हायकमांडशी बोलणी सुरु झाली असली तरी यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठींबा देताना अटी-शर्थी ठेवल्या असल्याने शिवसेनेला महाआघाडीचा पाठिंबा सोपा नाही, हे उघड झाले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र मुख्यमंत्री पद आणि सत्तेत समसमान वाटा देण्यावरुन महायुतीत मतमतांतरे निर्माण झाली आहेत. त्यात भर म्हणजे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेसाठी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला आमंत्रित केले होते.

मात्र भाजपनाने सत्ता स्थापनाचा दावा नाकारत शिवसेनेला सत्ता स्थापनासाठी शुभेच्छा दिल्याने आता सर्वांचे लक्ष शिवसेनेकडे लागून राहिले आहे. विशेष म्हणजे, शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करताना महाआघाडीची मदत घेते का? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

रविवारी सकाळपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खलबते सुरू होती. काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची जयपूर येथे हॉटेलमध्ये जाऊन भेट घेत चर्चा केली. या भेटीनंतर खरगे यांनी पत्रकाराना सांगितले की, अद्याप शिवसेनेला पाठींबा देण्यावरुन कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. जर त्यांचा प्रस्ताव आल्यास आम्ही यासंदर्भात हायकमांडशी चर्चा करुन निर्णय घेऊ. दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी सिल्वर ओक येथे जाऊन शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली. त्यानंतर मात्र त्यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला.

दरम्यान, महाआघाडीबाबत शिवसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नाही, असे राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांना त्यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानातून बाहेर पडत असताना पत्रकारांनी गाठले आणि याविषयी प्रतिक्रिया मागितली. तेव्हा शरद पवार यांनी आपल्याला शिवसेनेकडून असा कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे म्हटले. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेनेला पाठीबा देताना अटी आणि शर्थी ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अद्याप सेनेला पाठींबा देण्यावरुन महाआघाडीमध्ये संभ्रम कायम असल्याचे दिसून आले आहे.