केंद्र सरकारची दुटप्पी भूमिका, पण राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी! – वडेट्टीवार

शेतकऱ्यांना मदतनिधी देण्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये टोलवाटोलवी सुरू असताना राज्य सरकारमधील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारची भूमिका मांडली आहे. यासोबतच त्यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील विरोधी पक्षावर देखील टीका केली आहे. ‘राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतनिधीसाठी ४ जिल्ह्यांमध्ये २०० कोटींच्या मदतनिधीचं वाटप पूर्ण केलं आहे. त्यासोबतच राज्य सरकार धान उत्पादकांना यंदाही बोनस देणार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहून प्रामाणिक प्रयत्न करत असताना केंद्र विरोधक आरोप करत आहेत’, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.