राज्यातील १०४ पोलीस निरीक्षक बढतीच्या प्रतीक्षेत

Mumbai

राज्यभरातील पोलीस अधिकारी बढतीच्या प्रतीक्षेत असून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या बढत्याचे आदेश होणे अपेक्षित होते, मात्र दीड महिने उटलूनही राज्य सरकारकडून अद्याप बढत्यांचे आदेश काढण्यात आलेले नाहीत. बढतीच्या प्रतीक्षेत असणारे काही अधिकारी येत्या काही महिन्यात सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या बढत्यांमुळे मुंबईसह राज्यभरातील पोलीस दलात पोलीस अंमलदारापासून पोलीस निरीक्षकापर्यंतच्या बदल्या रखडल्या आहेत. दरम्यान मुंबईतील काही पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त झाल्यामुळे त्या जागा अद्याप रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत. बढत्या आणि बदल्याच्या प्रतीक्षेत असणारे अधिकारी काम करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे चित्र सध्या मुंबईतील काही पोलीस ठाण्यात पहायला मिळत आहे.

राज्य पोलीस दलातील १०४ वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त पदाच्या बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यभरातील १०४ पोलीस निरीक्षकांची बढतीची यादी राज्य सरकारच्या गृहखात्याकडे जानेवारी महिन्यातच पाठवण्यात आलॆली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर या बढत्या होणे अपेक्षित होते, मात्र जून संपून जुलै महिना सुरु होऊन १० तारीख उलटली परंतु अजूनही या बढत्यांचे आदेश गृहखात्याकडून काढण्यात आलेले नाही. राज्यभरातील बढतीच्या यादीत असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पोलीस महासंचालकाकडून सहायक पोलीस आयुक्ताच्या प्रशिक्षणसाठी खंडाळा आणि नाशिक येथे पाठवण्यात आले होते. वरिष्ठ निरीक्षकाच्या बढत्या नंतरच इतर अधिकर्‍याच्या बदल्या अपेक्षित आहे.

मुंबई पोलीस दलातील काही पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सेवानिवृत्त झाले आहे, त्याच्या रिक्त झालेल्या अद्याप भरण्यात आलेल्या नाहीत. या रिक्त पोलीस ठाण्याचा चार्ज पोलीस निरीक्षकांकडे सोपवण्यात आलेला आहे. तसेच मुंबईतील दोन पोलीस उपायुक्तांच्या जागा देखील रिक्त असून त्याचा भार दुसर्‍या परिमंडळातील पोलीस उपायुक्तांकडे देण्यात आलेला आहे. पोलीस अंमलदार ते पोलीस निरीक्षकांच्या बदल्या देखील या बढत्यांमुळे रखडलेल्या असून जोपर्यंत या बढत्याचे आदेश निघत नाही तोपर्यंत मुंबई तसेच राज्यातील इतर पोलीस दलातील बदल्या करता येत नसल्याचे पोलीस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. बढत्या आणि बदल्याच्या प्रतीक्षेत असणारे पोलीस अधिकारी काम करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे चित्र सध्या मुंबईतील काही पोलीस ठाण्यात बघायला मिळत आहे