महाडवासियांच्या डोक्यावर पाणी संकट

फक्त एकदिवसाचा पाणी साठा शिल्लक

Mumbai
Mahad

महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सून दाखल झाला असला तरी कोकणावर त्याने रुसवा धरल्याने तालुक्यातील धरणे रिकामी झाली आहेत. केवळ एक दिवसच पाणी पुरवठा होईल एव्हढेच पाणी आता शिल्लक राहिले आहे. त्यामुळे बुधवारपासून शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा करण्यात आला नाही.

गेले काही दिवस शहरात पाणी पुरवठा फार कमी वेळ होत आहे. रोहिदास नगर, प्रभात कॉलनी, बाजारपेठ, नवेनगर, वेताळवाडी, कुंभार आळी, तांबडभुवन, तांबटआळी आदी भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. बुधवारी सकाळी अनेक भागात केवळ दहा मिनिटेच पाणीपुरवठा करण्यात आल्याने नागरिकांचे खूप हाल झाले. शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या कुर्ले आणि कोथुर्डे धरणातील पाणी साठा जेमतेम एक दिवस पुरेल इतकाच राहिला आहे. कोतुर्डे धरणांतून काकरतळे, कोटेश्वरीतळे, चवदार तळे, सरेकर आळी, गोमुखी आळी, काजळपुरा, मोहल्ला, इंगावले आवाड, आदर्श नगर, भीमनगर, गुलमोहर सोसायटी या भागात होणारा पाणी पुरवठा काही ठिकाणी ठप्प झाला आहे.

शहराला १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. कुर्ला आणि कोथुर्डे धरणातील पाणी मे महिन्याच्या शेवटपर्यंत टिकून राहते. शहराला कुर्ले, कोथुर्डे, एमआयडीसी आणि लाडवली येथील जॅकवेलमधून पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये कुर्ले धरणातून दर दिवशी ११ लाख लीटर पाणी सोडण्यात येऊन दादली येथील पाण्याच्या साठवण टाकीमध्ये साठविण्यात येते. त्याचप्रमाणे कोतुर्डे येथून १७ लाख, एमआयडीसीतून ६ लाख आणि लाडवली जॅकवेलमधून ३ लाख असे एकूण दररोज सुमारे ३७ लाख लीटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. येत्या दोन दिवसात पाऊस न पडल्यास संपूर्ण शहरावर पाणी संकट ओढवणार आहे.

नागरिकांनी पाणी जपून वापरले पाहिजे. पावसाअभावी ही धरणे रिकामी झाली असली तरी औद्योगिक वसाहतीच्या पाणी पुरवठा विभागातून शहराला पाणी पुरवठा केला जात आहे.
-स्नेहल जगताप, नगराध्यक्षा

कुर्ले आणि कोथुर्डे धरणातील पाणी साठा संपत आल्याने शहरात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे.
-जीवन पाटील, मुख्याधिकारी, नगर परिषद