घरमुंबईएटीएम कार्डची अदलाबदल करत तब्बल ६६ हजारांची फसवणूक

एटीएम कार्डची अदलाबदल करत तब्बल ६६ हजारांची फसवणूक

Subscribe

कॅश डिपॉझीट मशीनद्वारे बँक खात्यात पैसे भरण्यासाठी गेलेल्या तरुणाची दोघा भामट्यांनी दिशाभूल करुन त्याच्या एटीएम कार्डची अदलाबदल करुन त्याच्या बँक खात्यातील तब्बल ६६ हजार ३०० रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी दोघा भामट्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणातील तक्रारदार मजाहीर आसा मोहम्मद (वय २९) हा कळंबोलीतील रोडपाली भागात राहणारा असून तो उरणच्या दिघोडे भागात मॅकेनिक म्हणून काम करतो. मजाहीर याला बिहार येथे वास्तव्यास असणार्‍या आईला ५० हजारांची रक्कम पाठवायची असल्याने तो कळंबोली येथील पीएनबी बँकेच्या कॅश डिपॉझीट सेंटरमध्ये गेला होता.

यावेळी मजाहीरने तेथील सीडीएममध्ये दोन-तीनवेळा पैसे जमा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा व्यवहार पूर्ण होत नव्हता. त्यामुळे त्याच्या पाठीमागे पैसे भरण्याच्या बहाण्याने उभ्या असलेल्या दोघा भामट्यांनी त्याला पैसे भरण्यावरुन बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे मजाहीर गोंधळला असतानाच त्यातील एका भामट्याने त्याला पैसे भरण्यास मदत करण्याच्या बहाण्याने त्याचे एटीएम कार्ड आपल्याकडे घेऊन त्याचे पैसे जमा केले.

- Advertisement -

दरम्यान, व्यवहाराच्यावेळी भामट्याने मजाहीरच्या एटीएम कार्डाचा पासवर्ड पाहिला असल्याने त्याने मजाहीरला आपल्याजवळचे एटीएम कार्ड देऊन त्याचे एटीएम कार्ड आपल्याकडे ठेवले. मजाहीर तिथून निघून गेल्यानंतर दोघा भामट्यांनी त्याच्या एटीएम कार्डचा पाच वेळा वापर करुन त्याच्या बँक खात्यातून तब्बल ६६ हजार ३०० रुपयांची रक्कम काढून घेतली. काही वेळानंतर मजाहीर याच्या मोबाईलवर पैसे काढून घेतल्याचे मेसेज आल्यानंतर त्याने आपल्याजवळचे एटीएम कार्ड तपासले असता, ते दुसर्‍या व्यक्तीचे असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर सीडीएम सेंटरमध्ये पैसे भरताना दोघा भामट्यांनी एटीएम कार्डाची अदलाबदल करुन त्याच्या बँक खात्यातून ही रक्कम काढून घेतल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने बँकेत धाव घेऊन आपले एटीएम कार्ड बंद केले. या प्रकारानंतर घाबरलेल्या मजाहीरने गेल्या आठवड्यात कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणातील दोघा भामट्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -