घरमुंबईपाकिस्तानच्या कारवायांना सडेतोड उत्तर द्या

पाकिस्तानच्या कारवायांना सडेतोड उत्तर द्या

Subscribe

शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे उद्गार

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला ही दुर्दैवी घटना असून पाकिस्तानच्या अशा छुप्या कारवायांना आता केंद्र सरकारने सडेतोड उत्तर दिले पाहिजे, असे मत आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी व्यक्त केले.
बदलापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित मराठा महोत्सवाला रविवारपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचे उदघाटक म्हणून उपस्थित असलेल्या शिवेंद्रसिंह राजे यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. झाला प्रकार दुर्दैवी आहे त्याचा बदला घेतलाच पाहिजे. चर्चा बस झाली आता काहीतरी ठोस कारवाई करून दाखवा आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत,अशी सर्वांचीच भावना असल्याचे शिवेंद्रसिंह राजे यांनी सांगितले.

मोठा भाऊ दयनीय स्थितीत
मराठा आरक्षणाला सर्वानी पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले. ते म्हणाले की, कुणाचे काढून घ्या, कमी करून घ्या, अशी मागणी आम्ही कधीच केली नव्हती. मराठा समाजातील जे गरजू आहेत. त्यांना नक्कीच आरक्षणाची गरज आहे आणि त्यांना ते मिळाले पाहिजे. हीच आमची भूमिका आहे. नेहमीच मराठा समाजाने मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे. मोठा भाऊ असला तरी आज या भावाची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. त्यामुळे सर्वानीच या आरक्षणाला पाठिंबा दिला पाहिजे. छत्रपतींचा घराण्यात जन्मलो असलो तरी मराठा समाजापेक्षा मी मोठा नाही. समाज मोठा झाला तर आम्ही मोठे होऊ, समाज मागासलेला राहिला तर आम्हीही मागासलेलेच राहू, अशा शब्दांत आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठा समाज बांधवानी एकजूट कायम ठेवावी, समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मराठा महोत्सवात उपस्थित समाजबांधवाना केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -