वाडिया रुग्णालय प्रकरण – ‘हा शिवसेना आणि वाडियांचा छुपा डाव!’

वाडिया रुग्णालय बंद पडण्याच्या मुद्द्यावर आता भाजपने पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर म्हणजेच शिवसेनेवर टीका केली आहे.

sangli mahapur : two month old baby struggles of a in vadiva hospital
वाडिया रुग्णालय

वाडिया रुग्णालय प्रशासनाने रुग्णालय बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्ण हवालदील झाले असून रुग्णालय वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मात्र, याचवेळी भाजपकडून वाडिया बंद पाडणं हा पालिका सत्ताधारी आणि वाडिया कुटुंब यांचा संगनमताने केलेला डाव आहे, असा आरोप करण्यात आला आहे. भाजपचे आमदार आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा आरोप केला आहे. ‘नायगावमध्ये दुसरी जागा मिळावी, म्हणून हा सगळा डाव केला जात आहे’, असं देखील आशिष शेलार यावेळी म्हणाले.

वाडिया रुग्णालयात आर्थिक बेशिस्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने रुग्णालयाला दिला जाणारा निधी थांबवला होता. त्यामुळे रुग्णालयाचा कारभार चालवणं कठीण झालं आहे असं कारण देत रुग्णालय बंद करत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला असून रुग्णांना अल्प दरात सेवा पुरवणारं हे रुग्णालय बंद होऊ नये, अशी मागणी केली जात आहे.

‘दुसऱ्या जागेसाठी हा डाव’

यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले, ‘वर्षानुवर्ष महापालिकेने आणि ट्रस्टने काहीही केलेलं नाही. आता नायगावमध्ये दुसरी जागा हवी म्हणून हा डाव केला जात आहे. मुंबई महापालिकेतले सत्ताधारी आणि वाडिया यांचा हा छुपा डाव आहे. त्यांच्यामुळेच हॉस्पिटल बंद पाडण्याची पाळी आली आहे. आम्ही हे हॉस्पिटल बंद पडू देणार नाही. याविरोधात जनआंदोलन सुरू करणार आहोत. आजपासून आंदोलन सुरू होईल. हा सगळा नुरा कुस्तींचा डाव आहे’, असं आशिष शेलार म्हणाले.