Friday, August 7, 2020
Mumbai
28.8 C
घर महामुंबई कंत्राटदारच नगरसेवकांच्या मांडीला मांडी लावून बसतात तेव्हा…

कंत्राटदारच नगरसेवकांच्या मांडीला मांडी लावून बसतात तेव्हा…

कार्यशाळेत मांडलं अर्थसंकल्पांऐवजी मांडल मुंबईच २०३० च व्हिजन.

Mumbai
bmc
महापालिका

मुंबई महापालिकेचा आगामी अर्थसंकल्प बनवताना, गटनेते आणि स्थायी समिती सदस्यांकडून सूचना विचारात घेण्यासाठी बोलावलेल्या कार्यशाळेत चक्क नगरसेवक आणि रस्ते कंत्राटदारांना एकाच रांगेत बसवले. या कार्यशाळेत आगामी अर्थसंकल्पांऐवजी २०३० च्या मुंबईच्या दृष्टीकोनातून विचार जाणून घेण्यात आला. विशेष म्हणजे मुख्यालयात जागा असताना सल्लागाराच्या कार्यालयात ही कार्यशाळा आयेाजित केल्याने आधीच नाराजी ओढावून घेणार्‍या प्रशासनाने कंत्राटदारांनाही तिथे निमंत्रित केल्यामुळे नगसेवकांमधील नाराजी आता तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रस्ते आणि आरोग्य खात्याच्या समस्या व पुढील विकासाची वाटचाल या विषयावर विचार मंथन करण्यासाठी शुक्रवारी दुपारी लोअर परेल येथील वन इंडियाबुल्स सेंटर येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेला सर्व गटनेते, स्थायी समिती सदस्यांना निमंत्रित करण्यात आले होते. याला महापालिकेचे संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते. आगामी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात रस्ते व आरोग्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीबाबतही चर्चा करण्यात येणार असल्याचे आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी म्हटले होते.

परंतु, प्रत्यक्षात विरोधी पक्षनेते रवी राजा, सभागृहनेत्या विशाखा राऊत, सपाचे गटनेते रईस शेख वगळता अन्य स्थायी समिती सदस्य या कार्यशाळेला उपस्थित राहिले. परंतु, या नगरसेवकांबरोबरच रस्ते आणि औषधांचा पुरवठा करणारे कंत्राटदारांनाही निमंत्रित करून २०३० पर्यंत मुंबई कशी असेल याचे सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे नगरसेवक आणि कंत्राटदारांना एकाच रांगेत बसून नगरसेवकांसोबतच त्यांचेही विचार जाणून घेतल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे.

रस्ते आणि आरोग्याच्या कार्यशाळेत नगरसेवक, कंत्राटदार एकाच रांगेत

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, आयुक्तांनी स्थायी समिती सदस्यांना निमंत्रित केल्यामुळे आम्ही तिथे गेलो होतो. परंतु, तिथे गेल्यानंतर आमच्या पाठिमागे कंत्राटदार बसल्याचे दिसून आले. अर्थसंकल्पावर नगरसेवकांच्या सूचना जाणून घेताना, कंत्राटदारांकडूनही सूचना जाणून घेण्यात आल्या. त्यामुळे आयुक्तांचा हेतू चांगला असला तरी कंत्राटदारांना नगरसेवकांसोबत बोलावणे योग्य नाही. त्यामुळे या बैठकीत नगरसेवकांना मनमोकळेपणाने सूचना करता न आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी या कार्यशाळेसंदर्भात बोलतांना, आयुक्तांनी प्रथमच अशाप्रकारची संकल्पना राबवून अर्थसंकल्प बनवण्याचा प्रयत्न केल्याचे ऐकून आनंद झाला होता. परंतु, प्रत्यक्षात कार्यशाळेला पोहोचल्यानंतर तिथे रस्ते आणि औषध कंपन्यांचे कंत्राटदारही उपस्थित होते. आगामी अर्थसंकल्पाबाबत त्यांनी काहीही जाणून न घेता २०३० मध्ये मुंबई कशी असेल याचे सादरीकरण केले. तसेच सूचना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कंत्राटदार उपस्थित असल्याने आपण याला हरकत घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महापालिका आयुक्तांच्या निमंत्रणानुसार आपण त्या कार्यशाळेला जाणार होतो. परंतु, महापालिका प्रशासनाने ही कार्यशाळा महापालिका मुख्यालयात आयोजित न करता सल्लागाराच्या कार्यालयात आयोजित करणे हेच आपल्याला पटले नव्हते. त्यामुळेच आपण तिथे गेलो नाही. परंतु, तिथे स्थायी समिती सदस्यांसोबत कंत्राटदारांनाही बोलावण्यात आले होते आणि त्यांच्याकडून सूचना जाणून घेण्यात आल्या. रस्ते भ्रष्टाचार आणि त्यानंतर केलेल्या सुधारणांनुसार नव्याने मागवलेल्या निविदांमध्ये ज्या कंत्राटदारांनी अधिक बोली लावून कंत्राटे मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या सूचना प्रशासन काय म्हणून जाणून घेते, असा सवाल विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला.


हेही वाचा – ‘हा तर बाळासाहेबांचे फोटो वापरून वाढलेला पक्ष’; राऊत पुन्हा भाजपवर बरसले