महापालिका कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना ‘ते’ ५० लाख मिळालेच नाहीत!

bmc
मुंबई महापालिका

‘कोविड’मुळे मृत्यू पावलेल्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांची आर्थिक रक्कम दिली जाईल, अशी घोषणा महापालिका आयुक्तांनी केली होती. मात्र यातील जाचक अटींमुळे अनेक मृत कामगार आणि अधिकाऱ्यांचे नातेवाईक या मदतीपासून वंचित आहेत. आतापर्यंत १३२ कर्मचाऱ्यांचे कोविडमुळे मृत्यू झाले असले तरी केवळ ४ ते ५ नातेवाईकांचे दावे निकालात निघू शकले आहेत. पाच महिन्यांत एकाच कुटुंबाच्या हाती ही रक्कम पडली आहे. त्यामुळे ५० लाखांची फक्त घोषणाच होती का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर ही रक्कम संबंधितांना दिली जावी, अशी देखील मागणी केली जात आहे.

कोरोना कोविड १९ च्या प्रदुर्भावामुळे मुंबईत आजवर लाखो रुग्ण बाधित झाले आहेत. यामध्ये मुंबई महापलिकेच्या सुमारे २६०० कर्मचाऱ्यांना याची बाधा झाली. त्यातील १३२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, यातील कोविडमुळे किती जणांचा मृत्यू झाला याची कागपत्रांच्या आधारे शहानिशा केली जात आहे. केंद्र सरकारने कोविड मुळे मृत्यू पावणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांचे विमा सरंक्षण देत आर्थिक मदत देण्याचे परिपत्रक जारी केले. त्यानुसार याचा लाभ मुबई महापलिकेच्या मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

महापालिकेच्या आतापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांचे विम्याचे दावे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या वतीने निकालात काढले जात आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे दावे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या विमा कक्षाच्या वतीने तयार करून कंपनीला पाठवले जात आहेत. परंतु कंपनीच्या निकषानुसार जो कर्मचारी १६ दिवस आधी कोविड ड्युटीवर असेल आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असल्यास त्यांनाच या विम्याचा लाभ मिळू शकतो. मात्र या अटी मुळे दावे केलेल्या महापालिकेच्या बहुतांश कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळू शकलेला नाही. रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय सह रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना कोविडची ड्युटी ग्राह्य मानली जाते. परंतु महापालिकेच्या अनेक विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवा कोविडसाठी घेतल्या जात आहेत. तसेच पर्जन्यजल अभियंता, घनकचरा विभाग, मलवाहिनी, जलवाहिनी विभाग आदींसह महापालिकेच्या सर्व विभागाचे कर्मचारी सेवेत असल्याने कोविडच्या काळातही ते कामावर रुजू झाले होते. मात्र, कोविडच्या प्रादुर्भावामुळे अनेक कर्मचाऱ्यांना याची बाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोविड ड्युटी असलेल्याच मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचा अटींमुळे अनेक कुटुंबीय यापासून वंचित राहिले आहेत.

महापालिकेच्या अनेक मृत कर्मचाऱ्यांचे दावे याच निकषांच्या आधारे फेटाळले गेले. त्यामुळे आतापर्यंत ४ ते ५ मृत कर्मचाऱ्यांचे दावे निकालात निघाले असून त्यातील शीव रुग्णालयातील शवागारामध्ये मृत कामगारांच्या एकाच कुटूंबाला ५० लाख रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने या नियमात बदल करून मृत कोविड योद्धाच्या कुटुंबाला मदत कशी मिळेल याचा प्रयत्न करावा , अन्यथा आम्ही रस्त्यांवर उतरून आंदोलन करू असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी दिला.

केंद्र सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे कोविड बाधित मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत दिली जाते. खात्याकडून आलेले प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवले जातात. जर त्यात त्रुटी असल्यास ते पुन्हा महापालिकेकडे पाठवतात. आणि मग विभागाच्या माध्यमातून मृत कुटुंबिय आणि संबंधित विभाग यांच्याशी पाठपुरावा केला जातो. महापालिकेच्या रुग्णालयीन कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवांचे कर्मचारीही कोविडच्या कामाला होते. याची कल्पना केंद्र सरकारला देऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच याबाबत पाठपुरावा सुरू आहे.

संध्या व्हटकर, प्रमुख कर्मचारी अधिकारी, मुंबई महापालिका