घरमुंबईकॅन्सरचा नेम चुकवणारी भारताची शार्प-शूटर!

कॅन्सरचा नेम चुकवणारी भारताची शार्प-शूटर!

Subscribe

वयाच्या चौथ्या वर्षी तिला रक्ताच्या कॅन्सरने ग्रासले, मात्र त्यानंतरही ती थांबली नाही. कॅन्सरसारख्या भयंकर आजारावर तिने मात करीत जगाच्या पाठीवर आपले नाव कोरले आहे.

वयाच्या चौथ्या वर्षी तिला रक्ताच्या कॅन्सरने ग्रासले, मात्र त्यानंतरही ती थांबली नाही. कॅन्सरसारख्या भयंकर आजारावर तिने मात करीत जगाच्या पाठीवर आपले नाव कोरले आहे. मॉस्को येथे कॅन्सरवर मात केलेल्या मुलांसाठी आयोजित केलेल्या ‘वर्ल्ड चिल्ड्रेन विनर्स गेम्स’ या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यासोबत पदकांची कमाई करून भारतीयांची मान अभिमानाने उंचविली आहे. ही कहाणी आहे ठाण्यात राहणार्‍या काव्या सगळगिळे हिची. नऊ वर्षांच्या काव्याने भाग घेतलेल्या पाचही क्रीडा प्रकारांमध्ये पदकांची लयलूट करीत सगळ्यांची मने जिंकली.

मॉस्को येथे नुकतीच कॅन्सरवर मात केेलेल्या मुलांसाठी ‘वर्ल्ड चिल्ड्रेन्स विनर्स गेम्स’चे आयोजन करण्यात आले होते. जगभरातील १५ देशांती मुले यात सहभागी झाले होते. यात भारताच्या नऊ मुलींनी भाग घेतला होता. ज्यात ठाण्याच्या काव्या सगळगिळे हिचाही समावेश होता. या स्पर्धेत भारताच्या टीमने बुद्धिबळ, टेबलटेनिस, स्विमिंग, रायफल शूटिंग, धावणे आणि फुटबॉल या सहा क्रीडा प्रकारांमध्ये एकूण २२ पदके (६ सुवर्ण, ७ रौप्य, ९ कांस्य) जिंकली. विशेष म्हणजे, त्यातील चार पदके ही रायफल शूटिंग या क्रीडा प्रकारातील आहेत. टाटा मेमोरियल सेंटरच्या ‘इम्पॅक्ट फाऊंडेशन’ या सेवाभावी संस्थेने नऊ मुला-मुलींना क्रीडा स्पर्धेसाठी यावर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मॉस्कोला पाठवले होते. पार्ल्याच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजचे प्रशिक्षक जितेश कदम आणि स्नेहल पापळकर-कदम या जोडप्याने या विद्यार्थ्यांना दोन महिने रायफल शूटिंगसाठीचे अत्याधुनिक प्रशिक्षण दिल्याची माहिती टाटा मॅमोरियल हॉस्पिटलच्या डॉ. अमिता भाटीया यांनी दिली.

- Advertisement -

नऊ वर्षीय काव्या ही बिलाबाँग शाळेतील विद्यार्थीनी आहे. तिने या स्पर्धेत एकूण पाच क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेतला होता. त्यात तिने बुध्दीबळ स्पर्धेत सुवर्ण, धावणे आणि टेबल टेनिस स्पर्धेत रौप्य पदक त्याचबरोबर स्विमिंग आणि शूटिंग स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले आहे. काव्याच्या या कामगिरीबद्दल तिच्या आई वडिलांनी अभिमान असल्याचे सांगितले. कॅन्सर सारख्या आजारावर मात करीत तिने हे यश मिळविले आहे. ते कौतुकास्पद असून तिने ज्या ज्या स्पर्धेत भाग घेतला त्यात तिने पदक जिंकले आहे. तिला नृत्याचीदेखील आवड असून ती त्याचे शिक्षण घेत आहेत. भविष्यात तिला शूटिंगमध्ये करिअर करायचे आहे, असे काव्याने ‘महानगर’शी बोलताना सांगितले.

अशी चालायची प्रॅक्टिस
या स्पर्धेत आठ ते सोळा वयोगटातील या मुलांनी यापूर्वी कधीही रायफल हातात धरली नव्हती, पण त्यांच्यात जिद्द होती. रोजची शाळा सांभाळून ही मुलं आठवड्यात चार दिवस दररोज दोन तास प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल शूटिंग रेंजमध्ये रायफल शुटिंगचा सराव करत असत.

- Advertisement -

प्रेरणादायी प्रवास
नियमित वैद्यकीय पाठपुराव्यामुळे लहान मुलांमधील कॅन्सर पूर्णपणे बरा होतो, इतकंच नव्हे तर ही मुलं पुन्हा एकदा सुंदर आयुष्य जगू शकतात, हे या छोट्या नेमबाजांनी सिद्ध करून दाखवलं आहे. या मुलांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवलेलं यश हे समाजातील प्रत्येकासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. या यशामुळे त्यांच्या मनातील नैराश्य दूर होऊन त्यांचा आत्मविश्वास बळकट होणार आहे. – स्नेहल कदम, प्रशिक्षक.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -