घरमुंबईचांद्रयान-2 मध्ये महाराष्ट्राचा झेंडा

चांद्रयान-2 मध्ये महाराष्ट्राचा झेंडा

Subscribe

भंडार्‍याच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमधून यानासाठी इंधन

अनेक दिवसांच्या प्रयत्नाने अखेर शुक्रवारी सायंकाळपासून ‘चांद्रयान 2’मधील विक्रम लँडरचे चंद्रावर उतरण्याकडे सार्‍या जगाचे डोळे लागून राहिले होते. ‘चांद्रयान-2’ मोहिमेने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असला तरी ही मोहीम महाराष्ट्रासाठी अधिकच अभिमानास्पद ठरली आहे. चांद्रयान-2 अवकाशात यशस्वीपणे झेपावण्यासाठी आवश्यक असलेले इंधन महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्येच बनवण्यात आले होेते. विशेष म्हणजे जीएसलव्हीच्या उड्डाणासाठी आवश्यक असलेले हे इंधन संपूर्ण देशात फक्त भंडार्‍यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये बनवण्यात येते.

‘चांद्रयान-2’ने 22 जुलैला श्रीहरी कोटा केंद्रावरून जीएसएलव्ही एमके3- एम1 या उपग्रह वाहून नेणार्‍या यानाने अवकाशात झेप घेतली. जीएसएलव्ही एमके3- एम1 यानाची अवकाश झेप यशस्वी होण्यासाठी आवश्यक लिक्विड इंधन बनवण्यासाठी महत्त्वाचे घटक पुरवण्याची जबाबदारी भंडार्‍यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीवर होती. भंडार्‍यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीतील अधिकारी व कर्मचार्‍यांनी दिवस-रात्र एक करून इंधनासाठी आवश्यक असलेले आरडीएक्स, आरडीएक्स-वॅक्स, पीईटीएन, एनसी-बी12 हे घटक तयार करून ते चांद्रयानाच्या उड्डाणापूर्वी योग्य वेळी इस्रोकडे पाठवले. त्यामुळे इस्रोला आवश्यक असलेले इंधन वेळेत बनवणे शक्य झाले. विशेष म्हणजे अवकाश यानासाठी लागणारे इंधन बनवण्यासाठी आवश्यक असलेले आरडीएक्स, आरडीएक्स-वॅक्स, पीईटीएन, एनसी-बी12 हे घटक संपूर्ण भारतामध्ये फक्त भंडार्‍यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्येच बनवण्यात येते. ऑर्डिनन्स फॅक्टरीने केलेल्या सहकार्‍याबद्दल इस्रोचे उपसंचालक एम. मोहन यांनी भंडारा ऑर्डिनन्स फॅक्टरीचे महासंचालक ए. शानमुगम यांना पत्र पाठवून आभार मानले. या पत्रामध्ये त्यांनी तुम्ही केलेल्या सहकार्‍यामुळे ही मोहीम यशस्वी करणे शक्य झाले. तसेच यापुढील प्रत्येक मोहीमेमध्ये आम्हाला तुमचे असेच सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे चांद्रयान-2 मोहीम ही भारतातील नागरिकांसाठी अभिमानास्पद असली तरी महाराष्ट्रासाठी तिचे महत्त्व शब्दातीत असल्याची प्रतिक्रिया ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे सेंट्रल एक्झुक्युटिव्ह कमिटीचे सदस्य किशोर आखरे यांनी दिली.

- Advertisement -

चांद्रयान-2 मोहीमेमध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल इस्रोकडून ऑर्डिनन्स फॅक्टरीचे कौतूक करण्यात येत असताना केंद्र सरकार या ऑर्डिनन्स फॅक्टीचे खासगीकरण करण्याचा डाव आखत आहे. विशेष म्हणजे अवकाश यान उड्डाणासाठी आवश्यक इंधन बनवण्यासाठी वापरण्यात येत असलेले घटक भारतातील एका खासगी कंपनीकडून करण्याचा प्रयत्न अनेक दिवसांपासून सुरू आहे. परंतु त्यात त्यांना यश येत नाही. त्यामुळे ऑर्डिनन्स फॅक्टरींचे खासगीकरण केल्यास भारताच्या अवकाश मोहीमांच्या यशस्वीतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात, अशी माहिती अंबरनाथ ऑर्डनन्स एम्प्लाईज युनियनचे सहसचिव प्रशांत कुमार यांनी दिली.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -