घरमुंबईइंजिनियरींग प्रवेशप्रक्रियेची तक्रार थेट आयुक्तांकडे

इंजिनियरींग प्रवेशप्रक्रियेची तक्रार थेट आयुक्तांकडे

Subscribe

प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून परीक्षा देण्यापर्यंत अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यासंदर्भात केंद्र प्रमुखांकडे तक्रार करूनही शंकेचे निरसन होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना धावपळ होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुंबईत येणे शक्य नसल्याने त्यांची अडचण होते. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) विद्यार्थ्यांना आयुक्तांशी थेट संपर्क साधता यावा यासाठी राज्यभरात 50 सेतू केंद्रांवर कॉन्फरन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे इंजिनियरींग शाखेला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना आता गावातूनच आपली तक्रार थेट आयुक्तांसमोर मांडता येणार आहे.

इंजिनियरिंग शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असतो. गेल्यावर्षी जवळपास 70 हजार विद्यार्थ्यांनी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला होता. त्यामुळे इंजिनियरिंगच्या प्रवेश प्रक्रियेला दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी बसतात. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास विलंब होणे, कागदपत्रे तपासणीत अडचणी येणे, हॉल तिकिट मिळणे, परीक्षेचे केंद्र यासंदर्भात विद्यार्थ्यांना अनेक समस्या येत असतात. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय केंद्रावर संपर्क साधल्यास त्यांच्याकडून समस्येचे निरसन न झाल्यास विद्यार्थ्यांना मुंबईला सीईटी सेल किंवा तंत्रशिक्षण संचालनालयाकडे धाव घ्यावी लागते. परंतु यामध्ये त्यांचा बराचसा वेळ व पैसा वाया जातो, तसेच अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रवेशप्रक्रियेतील समस्या मांडण्यासाठी विद्यार्थ्यांना सीईटी सेलकडून कॉन्फरन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

- Advertisement -

कॉन्फरन्स सुविधा असलेले 50 केद्र राज्यात सुरू करण्यात येणार आहेत. प्रवेशप्रक्रियेदरम्यान आलेल्या समस्येसंदर्भात विद्यार्थ्यांनी केंद्रावरील समन्वयकांशी संपर्क साधल्यानंतरही त्यांची समस्या दूर होत नसल्यास त्यांना केंद्रावरूनच थेट मुंबईमध्ये सीईटी सेलच्या आयुक्तांशी संपर्क साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आयुक्तांशी कॉन्फरन्सद्वारे कधीही थेट संवाद साधून विद्यार्थ्यांना आपल्या समस्या मांडता येणार आहेत. प्रवेशप्रक्रियेबाबत सल्लामसलतही त्यांना कॉन्फरन्सद्वारे करता येणार आहे, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त डॉ. आनंद रायते यांनी दिली.

वैद्यकीय विद्यार्थ्यांनाही मिळाली संधी
वैद्यकीय प्रवेशप्रक्रियेवेळी विद्यार्थ्यांना आलेल्या समस्येचे निरसन करण्यासाठी राज्यभरात 11 केंद्रांवरून कॉन्फरन्सची सुविधा पुरवण्यात आली होती. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे इंजिनियरिंग प्रवेशप्रक्रियेवेळी त्यात वाढून करून 50 केंद्रावर ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहितीही सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -