घरमुंबईपित्याच्या चितेला मुलीनं दिला अग्नी; तिच्या हिंमतीला सलाम!

पित्याच्या चितेला मुलीनं दिला अग्नी; तिच्या हिंमतीला सलाम!

Subscribe

वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या चितेला मुलगा किंवा दुसरा पुरुषच अग्नी देऊ शकतो या प्रचलित रीतीच्या विरुद्ध जाऊन उल्हासनगरातल्या एका मुलीने नवा आदर्श घालून दिला आहे.

सर्वसामान्यपणे हिंदू धर्म पद्धतीत पित्याच्या चितेला फक्त मुलगाच अग्नी देतो. किंवा देऊ शकतो. स्त्री-पुरूष भेदभावाच्या ज्या अनेक चालीरीती हिंदू धर्मात अस्तित्वात आहेत, त्यातलीच हीसुद्धा एक. पण उल्हासनगरमधल्या श्रुती मल्ला हिने या कोणत्याही दांभिक चालीरितीचा भीडभाड न बाळगता आपल्या पित्याच्या चितेला स्वत:च अग्नी दिला. तिच्या हिंमतीला दाद देत आसपासच्या लोकांनी देखील तिच्या या भूमिकेला पाठिंबा दिला आणि एक नवा आदर्श घालून दिला. उल्हासनगरच्या मराठा सेक्शन परिसरात श्रीनिवास मल्ला हे गेल्या कित्येक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करत होते. याच परिसरात त्यांचा वृत्तपत्र विक्रीचा स्टॉल आहे. पत्नी आणि दोन मुलींसह ते इथे राहात होते. शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. उपचारांसाठी त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, प्रकृती अधिकच बिघडल्यामुळे त्यांचं उपचारांदरम्यान निधन झालं. पण श्रीनिवास मल्ला यांना दोघी मुलीच असल्यामुळे आता अंत्यसंस्कार कोण करणार? असा प्रश्न उभा राहिला.

Ulhasnagar Death

- Advertisement -

श्रीनिवास यांची अंतिम इच्छा?

वास्तविक श्रीनिवास यांचा भाऊ किंवा तशाच नात्यातील कुणी पुरूष आहे का याची एकीकडे चाचपणी सुरू असतानाच त्यांच्या पत्नीने वेगळाच प्रस्ताव समोर मांडला. ‘आपल्या पतीने आपल्या मृत्यूनंतर आपल्या चितेला मुलीनेच अग्नी द्यावा अशी इच्छा व्यक्त केली होती’, असं त्या म्हणाल्या. प्रसंग मोठा विचित्र होता. प्रचलित रीतीच्या विरूद्ध असा हा प्रस्ताव आणि श्रीनिवास यांची इच्छा होती. या प्रसंगी आसपासच्या समाजाने कशा पद्धतीने प्रतिसाद दिला असता, याचीही धास्ती होतीच. पण मल्ला यांच्या कुटुंबियांप्रमाणेच आसपासच्या समाजाने देखील तितकीच सामंजस्याची भूमिका घेतली आणि मल्ला यांच्या पत्नीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला.


हेही वाचा – नवी मुंबईतील सेंट लॉरेंन्स शाळेचा अजब फतवा

…आणि श्रुतीने दिला वडिलांना अग्नी!

त्यामुळे ठरल्याप्रमाणे शनिवारी दुपारी उल्हासनगरातल्या मुक्तीबोध स्मशानभूमीत श्रीनिवास मल्ला यांची मुलगी श्रुती मल्ला हिने वडिलांच्या चितेला अग्नी दिला. ही बाब जरी मल्ला यांची कौंटुंबिक बाब असली, तरी त्यांच्या कुटुंबियांनी, मराठा सेक्शनमधल्या नागरिकांनी घेतलेल्या सामंजस्याच्या आणि पुरोगामी भूमिकेमुळे इतरांपुढे हा एक वेगळा आदर्शच घातला गेला आहे असं म्हणायला हरकत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -