कुर्ल्यात तरुणाची भोसकून हत्या, परिसरात तणाव

कुर्ल्यामध्ये एका २८ वर्षांच्या तरुणाची हत्या करण्यात आली असून त्याचा मृतदेह एका ट्रकमध्ये सापडला आहे.

Mumbai
Mumbai: 27-year-old man killed by 7-8 people during his birthday celebrations last night in Ghatkopar

कुर्ल्यामधील वातावरण दिवसेंदिवस तणावपूर्ण होत असून गुरुवारी एका तरुणाची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. एका ट्रकमध्ये या तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून त्यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे कुर्ला परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

ट्रकमध्ये सापडला मृतदेह

मोहम्मद अक्रम मोहम्मद हुसैन शाह हे ठाण्यातल्या दहिसर मोरी, विशाल कंपाऊंड चाळ परिसरात राहतात. ट्रकचालक म्हणून ते काम करतात. गुरुवारी सायंकाळी सव्वासात वाजता त्यांनी त्यांचा ट्रक कुर्ला येथील पूर्व वाहिनीवरील टॅक्सीमन कॉलनीजवळील बीकेसीकडून कुर्लाच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर पार्क केला होता. शुक्रवारी दुपारी तीन वाजता ते तिथे आले. यावेळी त्यांना त्यांच्या ट्रकमध्ये एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं.


हेही वाचा – कामोठेत पूर्व वैमनस्यातून दिराने केली वहिनी-पुतण्याची हत्या

पोटावर आणि गळ्यावर वार

प्रकरणाचं गांभीर्य ओळखत त्यांनी तातडीने कुर्ला पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या तरुणाला पोलिसांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. त्याच्या पोटावर आणि गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या जखमा होत्या. गुरुवारी रात्री त्याची हत्या करून मारेकरी त्याचा मृतदेह ट्रकमध्ये टाकून पळून गेल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. त्याचे दोन्ही हातपाय देखील दोरीने बांधून ठेवण्यात आले होते.

मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही

२८ वर्षांच्या या तरुणाची ओळख पटली नसून त्याची ओळख पटावी यासाठी आता पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत. पोलीस ठाण्यात मिसिंग असलेल्या तरुणांची माहिती काढण्याचे काम सुरु असून लवकरच या तरुणाची ओळख पटेल. त्यानंतर मारेकर्‍यांचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.