साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा

अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक जन्मशताब्दी वर्षाच्या अनुषंगाने लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले‌.

Mumbai
Annabhau sathe
अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पत्राचाळ चिराग नगर घाटकोपर येथील स्मारक हे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने म्हाडाच्या सहकार्याने उभारावे असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. हे स्मारक अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या अनुषंगाने लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले‌.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यासंदर्भात आयोजित बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री तथा अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष दिलीप कांबळे, उपाध्यक्ष मधुकर कांबळे, आमदार श्रीकांत देशपांडे, संजय कुटे, सुधाकर भालेराव, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कपूर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, शिवशाही पुनर्वसन प्रकल्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर उन्हाळे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे आणि स्मारक समितीचे सदस्य उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने करावे व त्याला म्हाडाचे सहकार्य राहील. या स्मारकामध्ये सुसज्ज असे ग्रंथालय, सभागृह तसेच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अकादमी असेल. हे स्मारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिभेला साजेसे असे असेल. स्मारक हे आगामी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या अनुषंगाने लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here