उत्तर मुंबईत गोविंदाप्रमाणे उर्मिलाचा करिश्मा चालणार का?

काँग्रेसकची उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टींना टक्कर देणार आहे. २००४ प्रमाणे काँग्रेस या मतदारसंघात पुन्हा आपला झेंडा रोवणार की नाही हे पहावे लागणार आहे.

Mumbai
Govinda and Urmila
गोविंदा आणि उर्मिला मातोंडकर

मुंबई उत्तर मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. काँग्रेसने या मतदार संघातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उमेदवारी जाहीर केली आहे. आज काँग्रेसने याची अधिकृत घोषणा केली आहे. भाजपकडून या मतदारसंघात गोपाळ शेट्टींना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उर्मिला मातोंडकर गोपाळ शेट्टींना टक्कर देणार आहे. २००४ प्रमाणे काँग्रेस या मतदारसंघात पुन्हा आपला झेंडा रोवणार की नाही हे पहावे लागणार आहे. कारण भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघामध्ये २००४ साली काँग्रेसचा उमेदवार अभिनेता गोविंदाने भाजपचे उमेदवार राम नाईक यांचा दारुण पराभव केला होता. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचे मिशन पूर्ण होईल का हे पाहणे महत्वाचे ठरेल.

२००४ मध्ये भाजपचा दारुण पराभव

उत्तर मुंबई मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र या मतदार संघामध्ये काँग्रेसने २००४ साली काँग्रेसने विजय मिळवला होता. या मतदार संघातून सलग ५ वेळा भाजपचे दिग्गज नेते राम नाईक लोकसभेत निवडून आले होते. मात्र २००४ च्या निवडणूकीत काँग्रेसने अभिनेता गोविंदाला निवडणूकीच्या रिंगणात उतरवले. या मतदार संघातून काँग्रेसने गोविंदाला उमेदवारी दिली. गोविंदाने जोरदार टक्कर देत या मतदार संघात राम नाईक यांचा पराभव केला. मात्र गोविंदाने या मतदार संघात काहीच कामं केली नाही अशा तक्रारी येत होत्या त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा गोविंदाला उमेदवारी देण्यात आली नाही.

२००९ च्या निवडणुकीत काँग्रेसचाच विजय

२००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांना उमेदवारी दिली. संजय निरुपम यांनी देखील या मतदारसंघात जोरदार प्रचार आणि प्रचार करत पुन्हा काँग्रेसला विजय मिळवून दिला. संजय निरुपम यांनी २००९ ला भाजपचा पराभव करत भाजपचा बालेकिल्ल्यात चांगली पकड जमवली.

२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा संजय निरुपम यांना उमेदवारी दिली. मात्र मोदी लाटेमध्ये या मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला. भाजपने त्याकाळचे आमदार गोपाळ शेट्टी यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे केले. मोदी लाटेमुळे भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी विजयी झाले. गोपाळ शेट्टी यांनी संजय निरुपम यांचा ४ लाख ४६ हजार ५८२ मतांनी दारुण पराभव केला.

२०१९मध्ये शेट्टी विरुद्ध मातोंडकर लढाई

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा गोपाळ शेट्टी यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. २००४ प्रमाणे निवडणुकीत काँग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक शेट्टी विरुध्द मातोंडकर अशी असणार आहे. दरम्यान, उत्तर मुंबई मतदार संघामध्ये भाजपचे एकूण २४ नगरसेवक आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे पारडे जड आहे. त्यामुळे या मतदार संघात २००४ प्रमाणे काँग्रेसचा सेलिब्रिटीला उतरवण्याचा फॉर्मुला पुन्हा चालेल का हे पाहणे महत्वाचे ठरेल.

हेही वाचा – 

लोकसभा २०१९ : भाजपच्या गोपाळ शेट्टीविरोधात काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर मैदानात