घरमुंबईवाहतूक विभागामुळे रखडले ५०० किमीचे रस्ते

वाहतूक विभागामुळे रखडले ५०० किमीचे रस्ते

Subscribe

मुंबईतील ५०७.६२ किमी लांबीच्या रस्त्यांच्या कामांमध्ये निविदा प्रक्रिया सुरू असलेल्या सध्या २०२.३१ किमी लांबीच्या ६२४ रस्त्यांचा समावेश आहे. या कामांमध्ये शहर भागातील ४६.१६ किमी लांबीच्या १९९ रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे, तर पूर्व उपनगरातील ४७.८९ किमी लांबीचे १५५ रस्ते आणि पश्चिम उपनगरातील १०८.२६ किमी लांबीच्या २७० रस्त्यांचा समावेश आहे.

मुंबईत नव्याने उभारायच्या आणि दुरुस्ती करायच्या सुमारे ५०० किलोमीटरच्या रस्त्यांची कामे वाहतूक विभागाच्या नाकर्तेपणामुळे रखडली आहेत. यासाठी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला पोलिसांच्या वाहतूक शाखेने अद्याप परवानगी न दिल्याने ही कामे सुरू होऊ शकली नसल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबईतील विकासकामे पावसाळ्यात बंद ठेवली जातात आणि पावसाळा संपल्यावर ती पुन्हा सुरू केली जातात. या विकासकामात मुंबईतील रस्त्यांच्या उभारणीचे सर्वात मोठे काम आहे. पावसाळा संपल्यावर रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने सुरू केली जाणे अपेक्षित आहे. मात्र वाहतूक विभागाने अद्याप पालिकेच्या प्रस्तावाला परवानगीच दिलेली नाही. ही परवानगी मिळाल्यानंतर तातडीने पावसाळ्यानंतर रस्ते दुरुस्तीची कामे सुरू केली जातील.

मुंबईतील रस्त्यांची लांबी सरासरी १९४१.१६ किलोमीटर इतकी आहे. यात शहर विभागात ५०६.४६ किलोमीटर, पश्चिम उपनगरात ९२०.६४ किलोमीटर आणि पूर्व उपनगरात ५०७.०६ किलोमीटरच्या रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांवर असलेली वाहतुकीची वर्दळ, महानगर टेलिफोन निगम, महानगर गॅस अशा सेवा देणार्‍या कंपन्यांकडून सातत्याने रस्ते खोदले जातात. याशिवाय जलवाहिन्यांची गळती, पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे यामुळे रस्त्यांची दुरवस्था होते. या कारणाने पावसाळ्यानंतर ऑक्टोबरपासून रस्त्यांची दुरुस्ती व पुनर्बांधणीची कामे हाती घेतली जातात. पालिकेने शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील ५०७.६२ किमी लांबीच्या रस्त्यांची १ हजार ३४३ कामे ऑक्टोबर २०१८ पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पावसाळ्यामुळे थांबवण्यात आलेल्या ७१९ आणि नवीन १ हजार ३४३ रस्त्यांची आणि जंक्शनच्या दुरुस्ती कामांचा समावेश आहे.

- Advertisement -

मुंबईतील ५०७.६२ किमी लांबीच्या रस्त्यांच्या कामांमध्ये निविदा प्रक्रिया सुरू असलेल्या सध्या २०२.३१ किमी लांबीच्या ६२४ रस्त्यांचा समावेश आहे. या कामांमध्ये शहर भागातील ४६.१६ किमी लांबीच्या १९९ रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे, तर पूर्व उपनगरातील ४७.८९ किमी लांबीचे १५५ रस्ते आणि पश्चिम उपनगरातील १०८.२६ किमी लांबीच्या २७० रस्त्यांचा समावेश आहे.

उर्वरित ३०५.०८ किमी लांबीच्या रस्त्यांची ७१९ कामे ही पावसाळ्यामुळे थांबवण्यात आली होती. मागील दोन वर्षांपासून म्हणजेच २०१६ पासून ३१ मे २०१८ पर्यंत ५५२.७१ किमी लांबीच्या रस्त्यांची आणि २ लाख ८८ हजार २७८ चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळाच्या जंक्शनची कामे झाली आहेत.

- Advertisement -

पावसाळ्यामुळे थांबवण्यात आलेल्या कामांमध्ये ३०५.०८ किमी लांबीच्या ७१९ रस्त्यांचा समावेश आहे. यामधील २३८.४५ किमी लांबीचे रस्ते हे ‘प्रकल्प रस्ते’ या वर्गवारीतील आहेत. तर जे रस्ते पूर्णपणे नव्याने करण्यात येणार आहेत, अशा रस्त्यांचा समावेश ‘प्रकल्प रस्ते’ या वर्गवारीत करण्यात येतो. या व्यतिरिक्त ‘प्राधान्यक्रम २’ या वर्गवारीतील राहिलेल्या ७.७१ किमी लांबीच्या रस्त्यांची आणि प्राधान्यक्रम ३ अंतर्गत ५८.९२ किमी लांबीच्या रस्त्यांची कामेही ऑक्टोबर २०१८ पासून हाती घेतली जाणार आहे. रस्त्याच्या कामांदरम्यान वाहतूक बंद ठेवावी लागते, काही वेळा वाहतूक वळवावी लागते. रस्ते कामासाठी वाहतूक परवानगीची आवश्यकता असते. यासाठीचा प्रस्ताव पालिकेने दीड महिन्यांपूर्वी वाहतूक विभागाला पाठवण्यात आला होता. मात्र अजूनही याबाबत कुठलीही संमती या विभागाकडून मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.

रस्ते कामासाठी १५०८ कोटी खर्च

नवीन रस्ते कामांसाठी ६२ निविदांची प्रक्रिया सध्या सुरू आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ऑक्टोबर २०१८ मध्ये कार्यादेश दिले जातील. या निविदांमध्ये शहर विभागातील व पूर्व उपनगरातील प्रत्येकी १५, पश्चिम उपनगरातील ३२, अशा एकूण ६२ निविदांचा समावेश आहे. या कामांसाठी १ हजार ५०८ कोटी ८३ लाख एवढी अंदाजित रक्कम खर्च केली जाणार आहे. त्यातून ३८७ कोटी एवढी रक्कम शहर, ३७५ कोटी ६५ लाख रुपये पूर्व उपनगरांसाठी आणि ७४६ कोटी १७ लाख रुपये पश्चिम उपनगरांसाठी खर्च करण्यात येणार आहे. पण हे होताना अद्याप परवानगीच न मिळाल्याने ही कामे सुरू होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

५५२ किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण

मागील दोन वर्षांपासून म्हणजेच २०१६ पासून ३१ मे २०१८ पर्यंत ५५२.७१ किमी लांबीच्या रस्त्यांची आणि २ लाख ८८ हजार २७८ चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळाच्या जंक्शनची कामे केली आहेत.

मुंबई महापालिकेच्या रस्त्यांची आकडेवारी

१९४१.१६ किलोमीटर मुंबई महापालिकेचे एकूण रस्ते
५५२.७१ किलोमीटर सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे झाली
५०७.६२ किलोमीटर सिमेंट काँक्रिटीकरणासाठी निविदा
८८२.०० किलोमीटर सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते बाकी

परवानगीनंतर लगेचच काम सुरु करू

रस्ते कामासाठी वाहतूक शाखेच्या परवानगीची आवश्यकता असते. परवानगीसाठी वाहतूक शाखेबरोबर पाठपुरावा सुरु आहे. मात्र अद्याप परवानगी मिळालेली नाही. परवानगी लवकर मिळाली तर ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून रस्त्यांची कामे सुरू करू. – विनोद चिटोरे, प्रमुख अभियंता, रस्ते व वाहतूक खाते.

आधी खड्डे बुजवा, नंतर दुरूस्तीसाठी परवानगी

मुंबईतील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही पालिकेला पत्र लिहिले आहे. रस्ते दुरुस्ती आणि बांधणे ही कामे पावसाळ्यानंतर करण्यात येतात. रस्त्यांबाबत अनेक प्रकरणे प्रलंबित असून पावसाळा संपताच परवानगी देण्यात येईल. – अमितेश कुमार, सहआयुक्त, वाहतूक विभाग, मुंबई.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -