घरमुंबईएसीच्या उष्णतेवर वीज निर्मिती प्रकल्प

एसीच्या उष्णतेवर वीज निर्मिती प्रकल्प

Subscribe

नवी मुंबईत होणार पहिला प्रयोग

डाटा सेंटरसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्व्हर थंड ठेवण्यासाठी एअर कंडीशनरचा (एसी) वापर केला जातो. या एसी यंत्रणेतून उष्णताही बाहेर पडत असते. याच उष्णतेचा वापर करून वीज निर्मिती करण्याचा पहिला प्रायोगिक प्रकल्प येऊ घातला आहे. राज्यातील अशा पद्धतीने वीज निर्मिती करणारा हा पहिलाच वीज प्रकल्प असेल. नवी मुंबईत या प्रकल्पासाठी सध्या काम सुरू करण्यात आले आहे. डाटा सेंटरसोबतच कोल्ड स्टोरेज, मॉल्स, हॉस्पिटल, फार्मा कंपन्या अशा ठिकाणीही एसीच्या उष्णतेतून वीज निर्मिती होण्याची मोठी क्षमता आहे.

नवी मुंबईतील डेटा सेंटरच्या जागेवर हा दोन मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ही क्षमता २० मेगावॉटपर्यंतही वाढवता येऊ शकते. इनोव्हेटिव्ह इन्फोकॉम अ‍ॅण्ड आयटी पार्क तसेच एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हीसेस लिमिटेड यांच्यात या वीज निर्मितीसाठी करार झाला आहे. गॅसवर आधारीत ट्रायजनरेशन तंत्रज्ञानाचा वापर करून ही वीजनिर्मिती करण्यात येईल. डेटा सेंटरच्या एसीतून वीजनिर्मितीचा अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रकल्प असल्याचे इनोव्हेटिव्ह इन्फोकॉम अ‍ॅण्ड आयटी पार्क कंपनीचे संचालक अमर जाधव यांनी सांगितले. अशा प्रकल्पामुळे विजेवर होणारा खर्च कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवी मुंबई एमआयडीसीमध्ये ३ लाख चौरस फुटाच्या जागेवर हा गॅसवर आधारीत ट्रायजनरेशन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पारंपरिक वीज खरेदीपेक्षा १५ टक्के ते २० टक्के वीज खरेदी दरात घट होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गॅसच्या वापरासाठी एमजीएल तसेच गेल कंपनीसोबत गॅस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

एसीचा वापर असलेल्या ठिकाणी वीजनिर्मिती शक्य
कोल्ड स्टोरेज, मॉल्स, फार्मा कंपन्या, हॉस्पिटल्स अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात एसी वापरला जातो. त्यातून मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. या उष्णतेमुळे वीज निर्मिती होऊ शकते. तसेच महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरात डाटा सेंटर मोठ्या प्रमाणात आहेत. तेथेही अशी वीजनिर्मिती शक्य आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -