घरमुंबईपोलीस भरतीसाठी आलेल्या महिला रात्री रस्त्यावरच झोपल्या!

पोलीस भरतीसाठी आलेल्या महिला रात्री रस्त्यावरच झोपल्या!

Subscribe

मुंबईत सुरु असलेल्या पोलीस भरती दरम्यान पुरुष उमेदवारांना ज्या समस्यांना सामोरे जावं लागते , त्याच परिस्थितीचा सामना महिला उमेदवारांना देखील करावा लागत असल्याचे समोर आलं आहे. मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेले पुरुष उमेदवार आरे कॉलनीमध्ये भर उन्हात झोपलेले आढळले. हीच परिस्थिती महिला उमेदवारांची असल्याचे समोर आलं आहे. पोलीस भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवारांना मुलभूत सुविधा देखील देण्यात आल्या नव्हत्या. या महिला उमेदवारांना रात्रभर आरे कॉलनीच्या जंगलात उघड्यावर झोपावे लागले. महत्वाचे म्हणजे या महिला उमेदवार मरोळ पोलिसांच्या कॅम्पपासून अवघ्या १०० मीटरच्या अंतरावर झोपल्या होत्या. या परिसरात असणारे एक मंदिर व्यवस्थापकीय मंडळ या महिला उमेदवारांच्या मदतीला धावून आले.

आरे कॉलनी सारख्या जंगलात ज्या ठिकाणी बिबट्यांचा वावर असतो. अशा ठिकाणी बिबट्या कधीही हल्ला करु शकतो. अशा असुरक्षित वातावरणातदेखील या उमेदवारांनी रात्र उघड्यावर झोपून काढली. राज्यभरातून या भरती प्रक्रियेसाठी आलेल्या महिला उमेदवारांच्या राहण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नसल्याचे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले असल्याचे मत एका महिला उमेदवाराच्या भावाने सांगितलं. पोलीस भरती व्यवस्थापकांनी आम्हाला मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या असत्या तर बरं झालं असतं. कारण आमच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आम्हाला हॉटेलमध्ये जाऊन राहणे शक्य नाही, असं या महिला उमेदवारांनी सांगितलं. मुंबईसारख्या शहरात भरती प्रक्रियावेळी मुलभूत सोयी सुविधा मिळणार नाहीत, असं आम्हाला वाटलं नसल्याचे मत एका महिला उमेदवाराच्या वडिलांनी व्यक्त केलं. या भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवारांना विश्रांतीसाठी एक छोटीशी जागा देण्यात आली होती. मात्र त्याठिकाणी स्वच्छतागृहाची सोय नसल्याचे समोर आलं आहे.

- Advertisement -

आरे कॉलनी परिसरात असणारे श्री लेवा पाटीदार बजरंग सतसंग मंडळाचे अध्यक्ष हरीभाऊ मोगा हे या महिला उमेदवारांच्या मदतीला धावून आले. या महिला उमेदवारांसाठी त्यांनी जेवणाची व्यवस्था केली होती. त्याचप्रमाणे ज्या परिसरात या महिला उमेदवार राहत आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेसाठी लाईट देखील लावण्यात आले. तसंच जोपर्यंत ही पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे तोपर्यंत या उमेदवारांना आम्ही मदत करु, असं मोगा यांनी सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते इनतेखाब फारुकी यांनी या महिला उमेदवारांसाठी पाण्याची आणि नाश्त्याची सोय केली होती. राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या महिला उमेदवारांना मदत करण्याचे आश्वासन दिलं. ‘भरती प्रक्रियेच्या ठिकाणी आम्ही आमच्या टीमला तपासणीसाठी पाठवले असून, गरज पडल्यास आमच्या ऑफिसमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करु’, असं त्यांनी सांगितलं.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -