घरमुंबईमुंबईत धडकणार राष्ट्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा लाँगमार्च

मुंबईत धडकणार राष्ट्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा लाँगमार्च

Subscribe
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) १२ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणारे डॉक्टर, परिचारिका, अभियंते, वकील व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत कायम करावे या मागणीसाठी राज्यातील सर्व एनएचएम कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात आंदोलन पुकारले आहे. सरकारने दखल घ्यावी यासाठी एनएचएम कर्मचाऱ्यांमार्फत १८ ते २८ मे दरम्यान नाशिक ते मुंबई लाँगमार्च काढण्यात येणार आहे. हा मोर्चा २८ मे रोजी मुंबईतील आझाद मैदानात धडकणार आहे.  या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणाहून आरोग्य कर्मचारी नाशिकमध्ये दाखल होण्यास सुरू झाले आहे.
आंदोलकांसाठी तातडीची सेवा
लाँगमार्च दरम्यान आंदोलकांना त्रास झाल्यास त्यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी युनियनतर्फे १०८ क्रमांकाच्या सेवेचा वापर करण्यात येणार आहे. काही रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जिल्हा रुग्णालय, सिव्हिल रुग्णालय, प्राथमिक केंद्रांमधील एनएचएमच्या कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले. त्याचबरोबर ठिकठिकाणी पाणी व जेवणाची सोय केली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामुळे राज्यातील ग्रामीण व अति ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद, उपकेंद्रात तातडीने उपचार मिळणे सहज शक्य झाले. मात्र नागरिकांवर उपचारासाठी सदैव प्रयत्नशील असणारे डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाèयांना सरकारकडून तुटपुंज्या वेतनावर राबवण्यात येते. कंत्राटी पद्धतीने काम करत असल्याने नोकरीमध्येही स्थैर्य नाही. त्यामुळे राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली पदे परीक्षांमार्फत भरण्याऐवजी या पदांवर एनएचएमच्या डॉक्टर, परिचारिका व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी राष्ट्रीय आरोग्य अभियान युनियनचे राज्य अध्यक्ष नंदू कासार यांनी केली आहे.
एनएचएमअंतर्गत राज्यात १८ हजार कर्मचारी काम करत असून, यामध्ये सहा हजार डॉक्टर, ७५०० परिचारिका, प्रशासकिय सेवेत तीन हजार, चतुर्थ श्रेणीतील एक हजार कर्मचारी, याचबरोबर वकील व अभियंत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील एनएचएमअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सरकारी सेवेत कायम करण्यासाठी दोन वर्षांपासून संघटनेमार्फत विविध आंदोलन करण्यात येत आहेत. मात्र त्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने एप्रिलमध्ये राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले होते. यावेळी तीन मंत्र्यांची समिती स्थापन करून त्यामार्फत अभ्यास करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते. मात्र अद्यापही त्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर राष्ट्रीय आरोग्य अभियान युनियनतर्फे १८ ते २८ मे दरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँगमार्च काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -