घरCORONA UPDATEकोविड चाचणीत महाराष्ट्रातच नव्हेतर देशात महानगरपालिका पुढे; मुंबई महापालिकेचा दावा

कोविड चाचणीत महाराष्ट्रातच नव्हेतर देशात महानगरपालिका पुढे; मुंबई महापालिकेचा दावा

Subscribe

मुंबईत आत्तापर्यंत सुमारे २ लाख १२ हजार चाचण्या झाल्या असून हे प्रमाण दहा लाख लोकांमागे १६ हजार ३०४ इतके आहे.

महाराष्ट्राच्या तुलनेत मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण अलीकडे कमी झाल्याचे म्हटले जाते. पण त्यामध्येही तथ्य नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मुंबई वगळता महाराष्ट्रातील इतर भागात पूर्वी चाचणी करणाऱ्या वैद्यकीय प्रयोगशाळांची संख्या मर्यादित होती. ही संख्या अलीकडे वाढली आहे. त्यामुळेच उर्वरित महाराष्ट्रातील चाचण्यांची संख्या वाढली आहे. तर मुंबईतील दररोजच्या सरासरी चाचण्यांची संख्या कायम आहे. मुंबईत आत्तापर्यंत सुमारे २ लाख १२ हजार चाचण्या झाल्या असून हे प्रमाण दहा लाख लोकांमागे १६ हजार ३०४ इतके आहे. हे प्रमाण फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात सर्वाधिक असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या कमी झाल्याचे तसेच चाचणी, बाधित रुग्ण तसेच मृत रुग्ण या संदर्भात कमी-अधिक आकडेवारी दिली जात असल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्याने महापालिकेने याबाबत स्पष्टीकरण देताना हा दावा केला आहे. मुंबईत दररोज सरासरी ४ हजार चाचण्या केल्या जातात. ही सरासरी कायम आहे. ती कमी झालेली नाही. ३ फेब्रुवारी रोजी मुंबईत पहिली कोरोना चाचणी करण्यात आली तर दिनांक ११ मार्च २०२० रोजी पहिला कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला. ३ फेब्रुवारी ते ६ मे या कालावधीमध्ये मुंबईत १ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. तर १ जून  रोजी २ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. याचाच अर्थ दिनांक ६ मे ते १ जून या अवघ्या २५ दिवसांमध्ये दररोज सरासरी ४ हजार या दराने १ लाख चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आय.सी.एम.आर.) ही देशपातळीवरील संस्था असून चाचण्यांचे निकष याच संस्थेमार्फत ठरवले जातात. त्यानुसारच मुंबईतही चाचण्या होतात. या संस्थेने वेळोवेळी निश्चित करून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार महानगरपालिकेच्या वतीने कोरोना चाचण्या केल्या जातात. दिनांक १८ मे २०२० रोजी परिषदेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच सध्या चाचण्या होत आहेत. पूर्वी कोरोना बाधित रुग्णाच्या २ चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर त्यास घरी सोडले जात असे. सुधारित मार्गदर्शक तत्त्वानुसार आता फक्त १ चाचणी निगेटिव्ह आली तरी घरी सोडण्याची मुभा आहे. तसेच क्ष-किरण तपासणीमध्ये सुधारणा, ऑक्सिजन पातळीमध्ये सुधारणा असे सकारात्मक बदल दिसून आले तर योग्य वैद्यकीय परीक्षण आधारेदेखील चाचणी न करता रुग्णास घरी पाठवून विलगीकरण करता येते. प्रसूतीसाठी येणाऱया गर्भवती महिलांची पूर्वी सक्तीने चाचणी करण्यात येत असे. आता तशी आवश्यकता नाही. यासारख्या विविध सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमुळे देखील चाचण्यांची संख्या मर्यादित वाटते, मात्र ती अपुरी निश्चितच नाही.

ज्यांच्यामध्ये लक्षणे आढळतात अशा नागरिकांची प्राधान्याने तपासणी करून टेस्टिंग किटचा प्रभावी व सुयोग्य वापर करण्याची कार्यवाही आयसीएमआर आणि शासन यांच्या निर्देशानुसारच केली जात आहे. यामागे शास्त्रीय आधार आहे. लक्षणे नसलेल्या बाधित यांच्याकडून संक्रमणाचा धोका हा अत्यल्प असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी वारंवार सांगितले आहे. याच कारणाने लक्षणे दिसत असलेल्या व्यक्तींच्या चाचणीला आयसीएमआर यांच्या निर्देशानुसार प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -