आयडॉलच्या अंतिम परीक्षेत पुन्हा गोंधळ; लिंक, लॉगिन आयडी, पासवर्ड न मिळाल्याने विद्यार्थी आक्रमक

आर्ट्स व कॉमर्सच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा तांत्रिक कारणामुळे अचानक रद्द करण्यात आल्या. त्यामुळे गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी थेट आयडॉलकडेच धाव घेतली.

idol

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेला शनिवारपासून सुरुवात झाली. परंतु पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना परीक्षेची लिंक, लॉगिन आयडी व पासवर्ड मिळत नसल्याचा प्रकार मंगळवारी तिसर्‍या दिवशीही कायम राहिला. आर्ट्स व कॉमर्सच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा तांत्रिक कारणामुळे अचानक रद्द करण्यात आल्या. त्यामुळे गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी थेट आयडॉलकडेच धाव घेतली. मात्र कोणतेच उत्तर नसल्याने आयडॉलचे दरवाजे बंद करत प्रशासनाने विद्यार्थ्यांना समस्येकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयडॉल बाहेर जमा होत आपला संताप व्यक्त केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. मात्र ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाची कोणतीही तयारी नसल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. आयडॉलकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा ३ ऑक्टोबपासून घेण्यात येत आहेत. मात्र पहिल्या दिवसांपासून या ऑनलाईन परीक्षेला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांना लिंक न मिळणे, लॉगिन आयडी, पासवर्ड न मिळणे असे प्रकार घडत आहेत. तिसर्‍या आर्ट्स आणि कॉमर्सच्या अंतिम वर्षाची परीक्षा दुपारी १ ते २ वाजताच्या दरम्यान आयोजित केली होती. मात्र तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना लिंक न मिळाल्याने आयत्यावेळी ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आयडॉलकडून घेण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी आयडॉलच्या बाहेर जमण्यास सुरुवात केली. मात्र प्रशासनाकडे कोणतेही उत्तर नसल्याने विद्यार्थ्यांना बाहेरच रोखत आयडॉलचे दरवाजे बंद करण्यात आले. यावेळी तांत्रिक कारणामुळे रद्द झालेली परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे ऑयडॉलकडून सांगण्यात आले. परंतु आम्हाला प्रत्येकवेळी सुट्टी मिळणार नाही, असा पवित्रा घेत आयडॉल बंद करण्याचा नारा विद्यार्थ्यांनी दिला. त्याचप्रमाणे यापुढे परीक्षेत तांत्रिक अडचण आल्यास आम्हाला उतीर्ण करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली.

परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाकडून एका खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. या कंपनीकडून परीक्षेच्या पहिल्या दिवसापासून गोंधळ घालण्यात येत आहे. परीक्षेच्या २४ तास अगोदर विद्यार्थ्यांना लिंक पाठवणे आवश्यक असताना अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू झाल्यानंतरही लिंक मिळत नाही आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान येणार्‍या अडचणीसाठी विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना ०८०-४७१९१११६ या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर आयडॉलच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने ९६१९४८६२६५, ९६१९५३६८२९ आणि ९६१९७१३३४८ या तीन संपर्क क्रमांकांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र हे क्रमांक लागत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

परीक्षेच्या पहिल्या दिवसांपासून तांत्रिक गोंधळ घालण्यात येत आहे. यासंदर्भात आम्ही विचारणा केली असता त्यात सुधारणा करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र गोंधळ कायम राहिल्याने आम्ही यावर मॅनेजमेंट काऊन्सिलच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करत विद्यापीठाला जाब विचारणार आहे.
– प्रदीप सावंत, युवासेना सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ