घरमुंबईनळाला पाणी नसल्याने जोगेश्वरीतील रहिवाशांनी गाठला नैसर्गिक झरा

नळाला पाणी नसल्याने जोगेश्वरीतील रहिवाशांनी गाठला नैसर्गिक झरा

Subscribe

मुंबईकरांना देखील कमी पडलेल्या पावसाचा फटका सहन करावा लागत आहे. याची जास्त झळ ही जोगेश्वरीकरांना सहन करावी लागत आहे.

यंदा पुरेसा पाऊस नसल्याने विदर्भात भयाण परिस्थिती असून यंदा राज्यात दुष्काळाचे सावट आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे. मुंबईकरांना देखील कमी पडलेल्या पावसाचा फटका सहन करावा लागत आहे. मुंबईकरांना दररोज मिळणाऱ्या पाण्यामध्ये कपात करण्यात आली असून मुंबईतील बऱ्याच ठिकाणी झोपडपट्ट्यांमध्ये पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आला आहे. मात्र याची जास्त झळ ही जोगेश्वरीकरांना सहन करावी लागत आहे. कारण जोगेश्वरीतील काही भागात सध्या नागरिकांना चक्क पिण्याच्या २ हंड्यासाठीदेखील वणवण करावी लागत आहे.

स्थानिक नगरसेवकांचे मात्र दुर्लक्ष

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे जोगेश्वरीमध्ये शिवसेनेचा दबदबा असून ना राज्यमंत्री रवींद्र वायकर या विषयाकडे गंभीरपणे बघत ना शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक, त्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

- Advertisement -

या भागात पाणीबाणी

जोगेश्वरी पूर्वेतील संजय नगर, गोनी नगर, इंदिरा नगर, कोकण नगर, श्याम नगर, गांधीनगर, शंकरवाडी, एमएमआरडीए, पीपीडायस कंम्पाऊंड, जोगेश्‍वरी गुफा परिसर, ठाकुर नगर, आनंद नगर, पंपहाऊस, पुनमनगर, प्रेम नगर, गांधीनगर बांद्रा प्लॉट, यासह शिवटेकड़ी, मजासगाव टेकडी या भागातील महिला सध्या पुरेसे पाणी येत नसल्याने त्रस्त आहेत.

जोगेश्वरीतील काही भागात ऑलची समस्या आल्यामुळे काही दिवस रहिवाशाना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. मात्र मागील दोन दिवसापासून पालिकेचे अधिकारी पाहणी करत असून, दोन दिवसात संपूर्ण जोगेश्वरीतील निर्माण झालेला पाण्याचा प्रश्न सुटेल.
– अनंत नर, स्थानिक नगरसेवक

- Advertisement -

नळावरची गर्दी आता झऱ्यावर

कधी एक हंडा, कधी दोन हंडे असे मागील दोन महिन्यांपासून सुरू असल्याने जोगेश्वरीमध्ये राहणाऱ्या महिलांची आता नळावरची गर्दी आता झऱ्यावर दिसू लागली आहे. कपडे, भांडी धुण्यासाठी या महिला आता थेट झऱ्याचे पाणी वापर करतात अशी प्रतिक्रिया इथल्या रहिवाशांनी आपलं महानगरशी बोलून दाखवली. शिवटेकडी येथील महिलांनी तर जेव्हीएलआर रस्त्यालगत असलेल्या नैसगिक झऱ्याचा आधार घेतला आहे.

चाळीत पाण्याचा तुटवडा टॉवरमध्ये पुरेसे पाणी

दरम्यान जिथे कोकण नगर, श्याम नगर येथे चाळीमध्ये पाण्याचा तुटवडा भासत असताना मात्र या झोपड्याना लागूनच असलेल्या ग्रीन फिल्ड, धीरज तसेच ओबेरॉयच्या टोलेजंग इमारतींना मात्र पुरेसे पाणी मिळत असल्याचे समोर आले आहे. आपलं महानगरच्या प्रतिनिधींनी या इमारतीच्या सुरक्षा रक्षकांना गाठून या इमारतीमध्ये पुरेसे पाणी येते का याची शहानिशा केली असता पहाटे पाच ते सात पर्यत पुरेसे पाणी या टॉवरमध्ये सोडलं जात असल्याची माहिती मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -