घरमुंबईव्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण

व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण

Subscribe

माहरण करुन अपहरणकर्ते मोटारीसह पसार

विलेपार्ले पश्चिम येथील एका व्यवसायिकाच्या २१ वर्षीय मुलाचे ४ अनोळखी इसमानी मोटारीसह अपहरण करून त्याला मारहाण केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली आहे. पावभाजी घेण्यासाठी जुहू येथे आलेला असताना हा प्रकार घडला आहे. अपहरणकर्ते या मुलाला पवई येथे सोडून मोटार घेऊन पसार झाले असून या घटनेत हा मुलगा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास हा प्रकार घडला असून जुहू पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

आरुष शहा असे अपहरण करून सुटका करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. आरुष विलेपार्ले पश्चिम येथे आपल्या कुटुंसोबत राहतो. वडिलांच्या व्यवसाय सांभाळत तो शिक्षण घेत आहे. शनिवारी पहाटे आरुष हा आपल्या बलेनो या गाडीतून जुहू येथील कुपर रुग्णालय जवळ पावभाजी पार्सल घेण्यासाठी एकटाच आला होता. दरम्यान पावभाजी घेऊन तो घरी जाण्यासाठी मोटारीत बसला असता, काही इसम त्याच्या मोटरीजवळ आले, त्यांनी त्याला इशारा करून मोटारीची काच खोलण्यास सांगितली. परंतु सदर चारही इसम ओळखीचे नसल्यामुळे त्याने काच खाली घेतली नाही, मात्र त्यांनी बळजबरीने काच खाली घेण्यास सांगितली. आरुषने काच खाली घेतली असता एकाने त्याला तू ड्रग लिके जा रहा है, असे बोलून त्याला मोटारीचा डॅशबोर्ड खोलण्यास सांगून चोघेही इसम त्याच्या मोटारीत बळजबरीने बसले. त्यानंतर त्याला शस्त्र दाखवून त्याला मोटार चालवण्यास सांगितले. काही अंतरावर गेल्यानंतर चौघांपैकी एकाने मोटारीचा ताबा घेऊन आरुषला मारहाण करून त्याच्या हातातील घड्याळ, मोबाईल फोन, वाहन परवाना बळजबरीने काढून घेतला. त्यानंतर चारही अपहरणकर्त्यांनी मोटार जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथून पवई लार्सन अँड ट्यूब्रो येथे एका निर्जन ठिकाणी उभी करून जखमी आरुषला मोटारीतून बाहेर ढकलून दिले. त्यानंतर चौघेही ही मोटार घेऊन विक्रोळीच्या दिशेने पसार झाले.

- Advertisement -

आरुष तेथून कसाबसा घरी पोहचला व त्याने झालेला प्रकार वडिलांना सांगितला. दरम्यान वडिलांनी जुहू पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.या प्रकरणी जुहू पोलिसांनी चार अनोळखी अपहरणकर्त्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती जुहू पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -