घरमुंबईप्रात:विधीसाठी गेलेल्याला लाखांचा गंडा

प्रात:विधीसाठी गेलेल्याला लाखांचा गंडा

Subscribe

प्रात:विधीसाठी गेल्याने दुकानाचे शटर अर्धवट उघडे असल्याचा फायदा घेत दुकानातील ८० हजार रुपये लंपास करणार्‍या चोराला शिवडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. सलीम मुशीरजा शेख (२४) असे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव आहे.

फिर्यादी सुशीलकुमार महंत गोस्वामी यांची शिवडीच्या चांदणी चौकात अनेक वर्षापासून पानटपरी आहे. त्या पानटपरीच्या वरच्या भागातच ते राहतात. रात्रीच्या वेळी प्रात:विधीसाठी बाहेर जावे लागत असल्याने त्यांच्या पानटपरीचे शटर कायम अर्धवट उघडे असते. याची रेकी करून एका चोरट्याने त्यांच्या दुकानाच्या ड्रॉवरमधले ८० हजार रुपये चोरले . एल अँन्ड टी या कंपनीने या परिसरामध्ये त्यांच्या कामगारांची राहायची व्यवस्था केली आहे. त्यामुळे दिवसाकाठी या पानटपरीवर १२०० ते १४०० रुपयांचा धंदा होतो. गेल्या काही दिवसांपासून फिर्यादी सुुशीलकुमार आणि त्यांचा भाऊ दिलीपकुमारने मेहनतीचे पैसे गावी जाण्याकरता साठवून ठेवले होते. दोघेही भाऊ दुकानामध्येच वास्तव्याला असल्याने सर्व पैसे त्यांनी दुकानाच्या ड्रॉवरमध्येच ठेवले होते. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी फिर्यादी सुशीलकुमार प्रात:विधीसाठी बाहेर गेले होते.

- Advertisement -

भाऊ दिलीपकुमार रात्री उशिराने येत असल्याने नेहमीप्रमाणे त्यांनी दुकानाचे शटर अर्धवट उघडे सोडले. या मधल्या काळात चोराने संधी साधत दुकानातले ८० हजार रुपये लंपास केले. दिलीपकुमार घरी परतले तेव्हा ड्रॉवर उघडा पाहून त्यांना संशय आला पण भावाच्या हातून चुकून राहिला असेल असे समजून त्यांनी तो बंद केला. मात्र दुसर्‍या दिवशी सकाळी पानटपरी सुरु केल्यानंतर पैसे नसल्याचे पाहून त्यांना धक्का बसला आणि त्यांनी शिवडी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना त्या परीसरात काम करणारा एक कामगार दोन दिवसांपासून गायब असल्याचे समजले आणि त्यांनी त्याचा तपास सुरु केला. सदर आरोपी रे रोड परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली. पण त्याच्याकडून ८० हजारापैकी केवळ ९ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. सदर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. या गुन्ह्यात अजून कोणी सहभागी आहे का? याचा तपास शिवडी पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -