घरमुंबईडोंबिवलीत मतमोजणीची जय्यत तयारी; यंत्रणा झाल्या सज्ज

डोंबिवलीत मतमोजणीची जय्यत तयारी; यंत्रणा झाल्या सज्ज

Subscribe

ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघाची मतमोजणी डोंबिवलीत होणार असून यासाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली आहे.

ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघाची मतमोजणी डोंबिवलीतील ह.भ.प. सावळाराम महाराज क्रिडा संकुलातील कै. सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त सभागृहात होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली असून, सर्वच प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणीच्या एकूण ३१ फेऱ्या असल्याने निकाल रात्री उशिरापर्यंत जाहिर होऊ शकेल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी कादबने यांनी दिली.

कल्याण लोकसभा मतदार संघात १९ लाख ६५ हजार ६३७ मतदार असून त्यापैकी अंदाजे ८ लाख ४२ हजाराच्या आसपास मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. गुरुवारी, २३ मे रोजी क्रीडासंकुलातील कै. सुरेंद्र वाजपेई बंदिस्त सभागृहात मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरूवात होणार आहे. एकूण २०३६ ईव्हीएम मशीन असूनया ठिकाणी ८८ टेबल तैनात करण्यात आले आहेत. यातील चार टेबल पोस्टल मतमोजणीसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक टेबलावर चार कर्मचारी काम पाहणार आहेत. एकूण १०० अधिकारी आणि ४०० कर्मचाऱ्यांचा ताफा मतमोजणी व इतर कामासाठी तैनात असणार आहे. एका विधानसभेसाठी १४ जणांची टीम असणार आहे.

- Advertisement -

पोलिसांचा कडक पहारा

सावित्रीबाई फुले कलामंदिराच्या तळघरातील स्ट्रॉंगरूममध्ये ईव्हिएम मशीन मतपेटयांमध्ये सीलबंद करून ठेवण्यात आल्या असून त्या ठिकाणी पेालिसांचा कडक बंदोबस्त आहे. मतमोजणीच्या दिवशी सकाळी कै. सुरेंद्र वाजपेई बंदिस्त सभागृहात पोलीस बंदोबस्तामध्ये हलविण्यात येणार आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी ३०० व बाहेरील परिसरात ३०० पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. मतमोजणीच्या जास्तीत जास्त ३१ फेऱ्या होणार आहेत.

एका फेरीसाठी ३० ते ४० मिनीटं

एका फेरीसाठी किमान ३० ते कमाल ४० मिनिटे लागणार आहे. पोस्टाद्वारे आलेल्या मतांची मोजणी सुरवातीस घेण्यात येणार आहे. लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून त्यातील प्रत्येक ५ व्हीव्हीपॅड आणि ईव्हीएम मशीनमधील मतांची तपासणी सर्वात शेवटी होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी निकाल ऐकण्यासाठी क्रिडासंकूला बाहेर कार्यकर्ते व नागरिक यांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने क्रिडासंकुलाबाहेरील रस्त्यावर मंडप उभारण्यात आला आहे. त्यामुळे कल्याणकडे जाणारा हा रस्ता बुधवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून वाहतूकीस बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच बंदिस्त क्रीडा संकुलाबाहेर चार मंडप, भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, ध्वनीक्षेपक आणि एलईडीस्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

कुठे किती मतदान

कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथमध्ये ४४ टक्के, उल्हासनगरमध्ये ४२.५, कल्याण पूर्व ४१ टक्के, डोंबिवलीत ४३.२ कल्याण ग्रामिण ४६.०५ तर मुंब्रा-कळवा ३९ असे एकूण सरासरी ४५.२८ टक्के मतदान झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -