पालिका रूग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचे खासगी रूग्णालयात सिझेरीयन

केडीएमसीच्या डॉक्टरांकडून लूटमार , डॉक्टरला बजावली कारणे दाखवा नोटीस ...

Mumbai
रुक्मिणी बाई रुग्णालय

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणी बाई रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेवर पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचार न करता तिथल्या डॉक्टरने त्या महिलेला स्वतःच्या खासगी हॉस्पिटलमध्ये पाठवून सिझेरियन पध्दतीने प्रसूती केली. त्यानंतर २५ हजार रूपयांचे बिल त्या महिलेच्या कुटुंबियांच्या हाती दिल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणात उजेडात आला आहे. पालिकेच्या रूग्णालयात गोरगरीब रूग्णांना उपचार मिळण्यापेक्षा त्यांची लूटमार केली जाते. असे प्रकार चव्हाट्यावर आल्याने पालिकेच्या रूणालयातील भोंगळ आणि बेजबाबदार कारभार डॉक्टरांनीच वेशीवर टांगल्याने कल्याणकरांमध्ये तीव्र चीड व्यक्त केली जात आहे. डॉक्टरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेची कल्याणमध्ये रूक्मिणीबाई व डोंबिवलीत शास्त्रीनगर ही दोन हॉस्पिटल आहेत. आजूबाजूच्या परिसरातील शेकडो गोरगरीब रूग्ण दररोज पालिकेच्या रूग्णालयात उपचारासाठी येत असतात. कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात राहणार्‍या सुमन चव्हाण या गरोदर महिलेने सातव्या महिन्यात पालिकेच्या रूक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये नाव नोंदणी केली होती. तेव्हापासून ती महिला पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. मात्र सुमन यांना नवव्या महिन्यात प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्याने त्या रूक्मिणीबाई रूग्णालयात तपासणीसाठी गेल्या होत्या. मात्र पालिकेतील डॉक्टरांनी त्यांना परत पाठवून, पुन्हा ४ दिवसांनी बोलावले. त्यानंतर त्यांना कल्याण पूर्वेतील सुमंगल हॉस्पिटल या खासगी हॉस्पिटलमध्ये पाठवून त्या महिलेचे सिझेरियन पध्दतीने प्रसूती केली.

पालिका हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनीच सिझेरियन करून त्याचे बिल २५ हजार रूपये दिले. मात्र पैसे न भरल्यास डीस्चार्ज मिळणार नाही असेही त्यांना सांगणत आले. मात्र त्या गरीब कुटुंबियांनी कुठून तरी पैशाची जमवाजमव करून डॉक्टरांना २० हजार रूपये बिल अदा केले. मात्र सर्व पैसे दिल्याशिवाय प्रसूतीचे टाके काढण्यात येणार नाहीत, असा दमही डॉक्टरांनी त्या महिलेच्या कुटुंबियांना दिला, असे सुमनची आई रेणुका राठोड हिने सांगितले. हा सगळा प्रकार २५ नोव्हेंबर रोजी घडला असून पालिकेतील डॉ. अविनाश कावळे यांची लेखी तक्रार रेणुका राठोड यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके आणि वैद्यकिय आरोग्य अधिकार्‍यांकडे केली आहे. मात्र या प्रकारामुळे पालिकेतील डॉक्टर स्वत:च्या हॉस्पिटलमध्ये पाठवून त्यांची लूटमार करीत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

सदर प्रकरणाची चौकशी सुरू असून डॉ. अविनाश कावळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. (राजू लवंगारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, केडीएमसी)

माझ्या मुलीला पालिकेच्या रूग्णालयात उपचार न करता तिथल्या डॉक्टरांनी त्यांच्या खासगी रूग्णालयात नेण्यास सांगितले. तिकडे सिझेरियन करून २६ हजार रूपये बिल केले. त्यांंनी २० हजार रूपये दिले. उर्वरित सहा रूपये दिल्यानंतरच टाके काढण्यात येतील, असे सांगितले. आम्ही गोरगरीब कुठून इतके पैसे आणणार. गरीबांना उपचार मिळत नसतील तर मग पालिकेचे रूग्णालय कशासाठी बांधले आहेत.
-रेणुका राठोड, रूग्ण सुमनची आई.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here