Coronavirus: अत्यावश्यक सेवांना सोमवारपासून काही अटी-शर्तीवर सूट

Mumbai
lockdown in khar
खार येथे लॉकडाऊनचा उडालेला फज्जा

कोरोना कोविड १९ या संसर्गजन्य आजारास प्रभावी प्रतिबंध करण्याच्या संपूर्ण देशभरात ३ मे २०२० पर्यंत ‘लॉक डाऊन’ लागू करण्यात आले आहे. परंतु या अनुषंगाने केंद्र सरकारच्या सुधारित निर्देशानुसार दिनांक २० एप्रिल २०२० पासून नागरिकांच्या गरजांचा विचार करून काही अत्यावश्यक आणि गरजेच्या सेवांसाठी काही अटींसापेक्ष ‘लॉकडाऊन’ मध्ये मर्यादित सूट देण्यात येत आहे. काही प्रमाणात मर्यादित सूट देताना यापूर्वी देण्यात आलेल्या व यापुढे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे संबंधितांना बंधनकारक आहे. त्यानुसार सुनिश्चित कार्यपद्धतीचे (SOP) काटेकोरपणे पालन करण्यात थोडीशीही हयगय झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

मुंबईत मर्यादित स्वरूपात लागू करण्यात येत असलेली सूट ही ‘कंटेनमेंट झोन’ परिसरांना लागू नसेल. तसेच कार्यवाही दरम्यान नव्याने घोषित होणारी ‘कंटेनमेंट झोन’ यांना देखील ही सूट लागू नसेल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. आरोग्य आणि वैद्यकीय सेवांशी संबंधित विविध बाबींना लॉकडाऊनमधून मर्यादित सूट देण्यात येत आहे. यामध्ये रुग्णालये, दवाखाने, मेडिकल दुकाने, वैद्यकीय प्रयोगशाळा, वैद्यकीय संशोधन, औषध उपचार विषयक विक्री आणि पुरवठा करणारी दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने – रुग्णालय – औषध विक्री ठिकाणे, रुग्णवाहिका आणि रुग्णवाहिकेशी संबंधित बाबी, औषध गोळ्या निर्मितीशी संबंधित बाबी, रुग्णालय वा वैद्यकीय पायाभूत सुविधांशी संबंधित बांधकाम इत्यादी बाबींचा समावेश आहे. वैद्यकीय आणि आरोग्य विषयक बाबींशी संबंधित व्यक्तींना ‘सोशल डिस्टन्सींग’च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन कामाच्या आवश्‍यकतेनुसार प्रवास करण्यास अनुमती देण्यात आली आहे. परंतु या प्रवासादरम्यान त्यांच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

सर्व सेवांशी संबंधित व्यक्तींकडे प्रवास करतेवेळी आवश्यक ते प्रमाणपत्र, पास इत्यादी असणे गरजेचे आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार तसेच एक वर्ष कैदेच्या शिक्षेची तरतूद नियमांमध्ये आहे. संसर्गजन्य आजार प्रतिबंधाच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचे परिपूर्ण पालन न केल्याचे आढळून आल्यास किंवा खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंपनी, औद्योगिक संस्था, भागीदारी संस्था, व्यवसायिक संस्था इत्यादींचे संचालक / मालक / सचिव / संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंध कार्यवाहीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या किंवा तसा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन कारवाई होणार आणि २ वर्षांपर्यंत कैदेच्या शिक्षेची तरतूद नियमांमध्ये आहे. अफवा पसरवणे किंवा खोटी माहिती दिल्यास गुन्हा दाखल होऊन दंडासह एक वर्षापर्यंत कैदही होवू शकते.

या बाबींना सूट देण्यात आली – 

  • मत्स्योत्पादनाशी संबंधित विविध बाबींना सूट देण्यात आली आहे.
  • बँक, सेबी, इन्शुरन्स इत्यादी त्यात कार्यरत व्यक्तींना ही सूट संबंधित अटींसापेक्ष लागू असेल
  • वृद्धाश्रम, महिला आश्रम, बालकाश्रम, अनाथ आश्रम, निरीक्षण गृह इत्यादींचे दैनंदिन कामकाज चालू राहण्यासाठी आवश्यक त्या सर्वबाबी
  • पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल, एलपीजी, सीएनजी, पीएनजी इत्यादी इंधन विषयक बाबींशी संबंधित विविध कार्यवाही
  • दैनंदिन गरजांच्या अनुषंगाने आवश्यक त्या वस्तूंची मालवाहतूक करण्याशी संबंधित व्यवस्था, वाहने इत्यादी
  • प्रसारमाध्यम, केबल सर्विसेस, डायरेक्ट टू होम, डेटा व कॉल सेंटर इत्यादींशी संबंधित बाबी. हे कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या मदतीने चालवणे अपेक्षित.
  • दैनंदिन गरजांची संबंधित दुकाने. जसे की किराणा दुकान, भाजीविक्रेते, दूध विक्रेते, रेशन दुकान इत्यादी. ‘टेक अवे’ पद्धतीने खाद्यपदार्थ विक्री करण्यास परवानगी.
  • ई-कॉमर्स विषयक बाबी
  • लॉक-डाऊन मुळे अडकून पडलेल्या व्यक्तींसाठी लॉज, हॉटेल विषयक सेवा सुविधा मर्यादित स्वरूपात सुरू करणे

ज्या बाबींना लॉकडाऊन मधून काही प्रमाणात सूट मिळाली आहे, त्यांच्याशी संबंधित व्यक्तींनी प्रवास करताना चारचाकी वाहन असल्यास यातून चालकाव्यतिरिक्त एका व्यक्तीस प्रवास करण्याची परवानगी, तर दुचाकी वाहनावरून केवळ एकाच व्यक्तीस प्रवास करण्याची परवानगी. बस असल्यास त्यातून बसच्या एकूण क्षमतेच्या ३० टक्के असं क्षमतेने प्रवास करण्यास परवानगी.

 

खालील गोष्टींना मनाई करण्यात आली आहे.

√ सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एका ठिकाणी जमण्यास मनाई. पाच व्यक्तींपर्यंत देखील सोशल डिस्टन्सींग पाळणे बंधनकारक.

√ विवाह वा तत्सम समारंभ हे संबंधित व्यक्तींच्या परवानगीनेच मर्यादित स्वरूपात आयोजित करता येणार

√ सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा गुन्हा

√ गुटखा, तंबाखू इत्यादी बाबींच्या विक्रीवर पूर्णपणे प्रतिबंध

√ काम करण्याची ठिकाणी, कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सींग पाळणे बंधनकारक. त्याचबरोबर मास्क, सॅनिटायझर त्यांचा वापर करणे देखील बंधनकारक. कार्यालय किंवा औद्योगिक आस्थापना येथील अंतर्गत उपाहारगृहांमध्ये सोशल डिस्टन्सींग संबंधित बाबींचे परिपूर्ण पालन करणे बंधनकारक

√ कार्यालय किंवा औद्योगिक आस्थापना इत्यादी ठिकाणी असणाऱ्या लिफ्ट, प्रसाधनगृहे, कॅन्टीन, प्रवेश द्वार, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे यथायोग्यप्रकारे ‘डिसइन्फेक्ट’ करणे आवश्यक

√ ज्या ठिकाणी शिफ्टमध्ये काम चालते, त्याठिकाणी दोन शिफ्टमध्ये किमान एक तासाचे अंतर आवश्यक

√ लिफ्टमधून एकावेळी दोन ते चार व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवास करण्याची अनुमती नाही. तसेच, जिन्याचा वापर करण्यास कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करावे.